मुंबई : राज्य गेले १९ दिवसांपासून भारनियमनमुक्त असताना बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू असतानाच मंत्रालयात वीजपुरवठा खंडित झाल्याने ही बैठक आटोपती घ्यावी लागली. पाच मिनिटांत वीजपुरवठा पुन्हा सुरू झाला असला तरी मुळात वीजपुरवठा खंडित का झाला याची चौकशी ‘बेस्ट’ने सुरू केली आहे.

 देशातील अनेक राज्यांत भारनियमन सुरू असताना महाराष्ट्र भारनियमनुक्त ठेवल्याबद्दल ऊर्जा विभाग आपली पाठ थोपटून घेत असतो. बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक दुपारी ४ वाजता सुरू झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत ऑनलाइन हजेरी लावली होती. महत्त्वाच्या विषयांवर चर्चा सुरू असताना अचानक वीजपुरवठा खंडित झाला आणि ऑनलाइन उपस्थित असलेल्या मुख्यमंत्र्यांचा संपर्क तुटला. त्यानंतर काही मिनिटांत वीजपुरवठा पुन्हा सुरू झाला. पण, मंत्रिमंडळ बैठक आटोपती घेण्यात आली. तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित होऊन पाच मिनिटांत पुन्हा सुरळीत झाला, पण वीजपुरवठा नेमका कशामुळे खंडित झाला याचा शोध आम्ही घेत आहोत, असे बेस्टच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले.