सातही मजल्यांवर सुरक्षा व्यवस्थेत वाढ

नैराश्यापोटी मंत्रालयात आत्महत्या करण्याचे तसेच आत्महत्येच्या प्रयत्नांचे प्रकार वाढत असल्याने पोलीस यंत्रणा हडबडली असून या आत्महत्या रोखण्यासाठी मंत्रालयाच्या आवारातच मंत्री आणि त्यांच्या खात्यांच्या अधिकाऱ्यांनी जनता दरबार भरवावेत आणि तेथे लोकांना भेटावे, असा प्रस्ताव पुढे आला आहे. यामुळे मंत्रालयात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण येईल आणि लोकांचे म्हणणे ऐकून घेतले गेल्याने आत्महत्येचे टोक गाठण्याचे प्रकार होणार नाहीत, असा तर्क त्यामागे मांडला जात आहे.

गुरुवारी खुनाच्या गुन्ह्य़ात शिक्षा भोगत असलेल्या एका व्यक्तीने पाचव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. विष पिऊन धर्मा पाटील या शेतकऱ्याने मंत्रालयातच जीव दिल्यानंतर कीटकनाशक घेऊन प्रवेश करू पाहणाऱ्यांना पोलिसांनी रोखले होते. मात्र आता कुणी वरच्या मजल्यांवरून उडी मारणार असेल, तर त्यांना कसे रोखणार, असा प्रश्न यंत्रणेला पडला आहे. त्यामुळेच हा प्रस्ताव सरकारकडे मांडण्यात आला असून त्यावर चर्चा करून सरकार अंतिम निर्णय घेणार आहे, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

मंत्रालयात  शुक्रवारी तुलनेने गर्दी फारच कमी होती. परंतु गुरुवारच्या आत्महत्येने मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या सातही मजल्यांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी १७५ मनुष्यबळ आहे. शुक्रवारी त्यात आणखी वीस पोलीस कर्मचाऱ्यांची व अधिकाऱ्यांची वाढ करण्यात आली, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. मंत्रालयात दररोज तीन ते साडे तीन हजार लोक आपापली कामे घेऊन मंत्र्यांच्या भेटीसाठी येतात. मंत्रिमंडळा बैठकीच्या दिवशी तर, या अभ्यागतांची संख्या पाच ते सहा हजारापर्यंत जाते,  असेही त्यांनी सांगितले.

एवढय़ा मोठय़ा गर्दीत प्रत्येक माणसावर लक्ष ठेवणे पोलिसांना अशक्य आहे. मंत्रालयात येण्यापासून कुणाला रोखता येणार नाही. तो त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे ही गर्दी मंत्रालयाच्या आवारातच थोपविण्याच्या प्रस्तावावर सध्या विचार सुरु आहे. जिल्हा स्तरावर लोकांना त्यांची गाऱ्हाणी मांडण्यासाठी जनता दरबार भरविले जातात. त्याच धर्तीवर मंत्रालयाच्या आवारात जनता दरबारांचा विचार पुढे आला आहे.

काय घडेल?

  • आवारातच मंत्री व अधिकाऱ्यांची सहज भेट नागरिकांना होईल.
  • त्यामुळे मंत्रालय इमारतीत गर्दी करण्याची गरज उरणार नाही. आपला प्रश्न मांडून झाल्यावर लोकांना तेथूनच परतता येईल.