बांधकाम व्यावसायिक प्रदीप जैन हत्याप्रकरणी आज टाडा न्यायालयाने रियाझ सिद्दीकीला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सिद्दीकीला १९९३ मधील मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातही न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली होती.

प्रदीप जैन हत्या प्रकरणात कुख्यात गुंड अबू सालेमला याआधी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जैन यांची ७ मार्च १९९५ रोजी गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या कटात सामील असल्याचा आरोप सिद्दीकीवर होता. तो सिद्धही झाला होता. जैन हत्या प्रकरणात यापूर्वी अबू सालेम, मेहंदी हसन शेख, वीरेंद्र कुमार झांब यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

विशेष म्हणजे सिद्दीकीला या खटल्यात सरकारी साक्षीदार करण्यात आले होते. पण त्यानंतर त्याने साक्ष बदलली. त्यामुळे त्याला पुन्हा या प्रकरणात आरोपी करण्यात आले. हत्येच्या कटात सामील असल्याचा त्याच्यावरील आरोप सिद्ध झाला होता.