मुंबई : राज्यात दिवाळीपूर्वी विधानसभा निवडणुकीचे मतदान होण्याची शक्यता बळावल्यानंतर त्या दिशेने राजकीय पक्षांनीही तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडताच प्रचाराबरोबरच युती-आघाडी, जागावाटप यांचीही चर्चा सुरू झाली आहे.

महायुतीमध्ये कोणत्या पक्षाला किती आणि कोणत्या जागा सोडता येतील यावर भाजपमध्ये खल सुरू झाला आहे. ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप हाच मोठा भाऊ असेल, असे स्पष्ट करीत भाजप अधिक जागा लढणार हे स्पष्ट केले होते. अजित पवार गटाने विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने सोमवारी मुंबईत पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. गेल्या वर्षी फुटीनंतर झालेल्या पहिल्याच सभेत अजित पवार यांनी विधानसभेला ९० जागा लढणार असल्याचे जाहीर केले होते. लोकसभेत राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) वाट्याला फक्त चार जागा आल्याने विधानसभेला भाजप किती जागा सोडते याबाबत उत्सुकता आहे. लोकसभेची भरपाई विधानसभेला करू, असे अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी ‘लोकसत्ता लोकसंवाद’ काय्रक्रमात बोलताना सूचित केले होते. महाविकास आघाडीत शरद पवार यांनी विधानसभेच्या दृष्टीने चाचपणी सुरू केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Preparations of the political parties for the assembly elections have started amy
First published on: 27-05-2024 at 06:23 IST