वसई: दुचाकीचे कर्ज फेडण्यासाठी खासगी वसुली कंपनीच्या एजंटनी टाकलेल्या दबावामुळे एका हौशी नाट्यकलावंत तरुणाने आत्महत्या केली आहे. राहुल सकपाळ (२६) असे या तरुणाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्याने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमधून ही बाब उघडकीस आली आहे.

राहुल सकपाळ हा तरुण हौशी नाट्यकलावंत होता. त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. तर आई देखील दोन वर्षांपासून बेपत्ता झाली होती. त्यामुळे तो नालासोपारा पूर्वेच्या तुळींज परिसरातील घरात एकटाच रहात होता. त्याने कर्ज घेऊन एक दुचाकी घेतली होती. मात्र टाळेबंदीमुळे तो बेरोजगार झाल्याने त्याला दुचाकीचे कर्ज फेडणे शक्य होत नव्हते. ते फेडण्यासाठी त्याने मित्रांकडून कर्ज देखील घेतले होते.

दरम्यान, वसुली एजंटने त्याच्या मागे कर्ज फेडण्यासाठी तगादा लावला होता. त्यामुळे तो निराश झाला होता. याच नैराश्याच्या भरात शनिवारी संध्याकाळे त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कर्ज आणि आणि वसुली एजंटच्या तगाद्यामुळे आत्मत्या करत असल्याचे राहुलने चिठ्ठीत लिहून ठेवल्याचे त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितले. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

काम नसल्याने राहुल वर्तमानपत्रांचे सदस्य मिळविण्याचे काम घरोघरी जाऊन करत होता. त्याने विविध नाटकात लहान मोठ्या भूमिका साकारल्या होत्या आणि पुरस्कारही पटकावले होते. ३ वर्षांपूर्वी राहुलने काम केलेल्या ‘मजार’ या नाटकाला राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाले होते.