बेहिशेबी मालमत्ता तसेच मतदार यादीतील नावांचा गोंधळ यावरून गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील हे आधीच वादग्रस्त ठरले असताना त्यांनी निवडणूक अर्जात मालमत्तेची माहिती दडविल्याचा आरोप काँग्रेसने भाजपच्या आणखी एका मंत्र्याला रविवारी लक्ष्य केले.

रणजित पाटील यांची कन्या व मुलाच्या नावे मालमत्ता असून, त्याचा तपशील काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी जाहीर केला. पण या मालमत्तेचा निवडणूक उमेदवारी अर्जात उल्लेख करण्यात आलेला नाही.
मुलांच्या नावांवर कोणतीच मालमत्ता नाही, असे डॉ. पाटील यांनी अर्जात स्पष्ट केले होते. तरीही त्यांच्या मुलांच्या नावे विदर्भात मालमत्ता आहे. ही माहिती डॉ. पाटील यांनी शपथपत्रात का नमूद केली नाही, असा सवाल सचिन सावंत यांनी केला. निवडणूक आयोगाची दिशाभूल करणाऱ्या डॉ. पाटील यांची तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी काँग्रेसने केली.

मुख्यमंत्र्यांकडून पाठराखण
मतदार यादीत दुबार नावांबाबत डॉ. रणजित पाटील यांनी सविस्तर खुलासा केला आहे. अनेकदा अशी नावे राहून जातात. निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांची दुरुस्ती करताना ही नावे वगळली जातात, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहराज्यमंत्र्यांची पाठराखण केली.