scorecardresearch

मुंबई: यशवंत नाट्य मंदिराची नवी वास्तू उभी राहणार; प्रस्ताव मंजूर

यशवंतराव चव्हाण नाट्य संकुलाचे पुनर्निर्माण करण्याचा प्रस्ताव मुंबई येथे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळ आणि वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.

yashwant natya mandir
यशवंत नाट्य मंदिर (संग्रहित छायचित्र)

यशवंतराव चव्हाण नाट्य संकुलाचे पुनर्निर्माण करण्याचा प्रस्ताव मुंबई येथे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळ आणि वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.नाट्य परिषदेचे तहहयात विश्वस्त शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्य करण्यात आला. या बैठकीत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नियामक मंडळ उपस्थित होते. यशवंत नाट्य मंदिराकडे २००५ सालापासून अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र नसल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून नाट्यगृहाला टाळे लागले आहे. तसेच, यशवंत नाट्य मंदिराच्या वास्तुची दुरावस्था झाल्यामुळे ही पूर्ण वास्तू पाडून नव्याने वास्तू बांधावी असा प्रस्ताव नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्याकडे मांडला होता. “यशवंत नाट्य संकुलाची वास्तू पाडून तेथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या वास्तूत ५००, २५०-३०० आणि १२५ आसनांची तीन नाट्यगृहे असतील. तसेच, नाट्य परिषद आणि इतर घटक संस्थांचे कार्यालय असेल”, अशी माहिती नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी दिली.

हेही वाचा >>>“काहीजण म्हणतायत सगळं मीच केलं, अरे नाही बाबा, सरकार…”, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला!

या बैठकीत नाट्य परिषदेच्या गेल्या तीन वर्षातील(२०१९ ते २०२२) सर्व कामकाजही मंजूर करण्यात आले. नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे यांच्या पदाचा कालावधी पुढील वर्षी संपत असल्याने नव्याने निवडणूका जाहीर करण्यात याव्यात अशीही मागणी जोर धरत होती. त्यामुळे या बैठकीत २०२३ – २०२८ ह्या कालावधीसाठी निवडणूक घेण्याचा निर्णय घेऊन निवडणूक अधिकारी म्हणुन गुरुनाथ दळवी यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच, शंभरावे नाट्य संमेलन नवनिर्वाचित नियामक मंडळाकडून पार पाडणार असल्याचा निर्णयही एकमताने घेण्यात आला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-12-2022 at 17:40 IST