मुंबई : मेट्रो ७ (दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व) मार्गाचे दहिसर येथील विमानतळ प्राधिकरणाच्या जमिनीवरील प्रस्तावित कारशेड अखेर रद्द करण्यात आले आहे. आता जिथे मेट्रो ९ (दहिसर ते मीरा-भाईंदर) कारशेड होणार आहे त्या रायमुरढे गाव, भाईंदर येथेच मेट्रो ७ आणि ९ चेही कारशेड होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) बैठकीत या तिन्ही मेट्रो मार्गासाठी एकाच ठिकाणी कारशेड उभारण्यास मंजुरी देण्यात आली.  मेट्रो ७ चे काम वेगात सुरू असून येत्या काही महिन्यांतच पहिला टप्पा सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. पण मेट्रो ७ चे कारशेड निश्चित झालेले नव्हते. दहिसर येथे विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवर कारशेड प्रस्तावित होते. अखेर एमएमआरडीएने दहिसर येथील विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील कारशेड रद्द करण्याचा प्रस्ताव ठेवला. प्राधिकरणाने या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्याचवेळी मेट्रो ९ च्या मुरढे गाव येथील कारशेडच्या रचनेत बदल करत मेट्रो ९, ७ आणि ७ अ चे कारशेड एकाच ठिकाणी उभारण्याचा निर्णय घेतला.

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५ च्या कारशेडचा प्रश्नही अखेर मार्गी लागला आहे. कोनगाव एमआयडीसी येथील मौजे कशेळी येथे मेट्रो ५ चे कारशेड बांधण्यात येणार आहे. यासंबंधीच्या प्रस्तावालाही हिरवा कंदील देण्यात आला आहे.