संशोधन करणाऱ्या यंत्रणेचा अभाव; सदोष यांत्रिक मासेमारीमुळेही माशांचा मृत्यू

महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीवर मृत किंवा मृत:प्राय अवस्थेत येणाऱ्या दुर्मीळ व पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत संरक्षित सागरी जीवांचे संशोधन करण्याची यंत्रणा राज्य सरकारकडे उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. तसेच, बहुतांश सागरी जीवांचा मृत्यू हा मच्छीमारांच्या जाळ्यामंध्ये अडकून होत असल्याचेही समोर आले असून या मच्छीमारांच्या वर्तनावर शासनाचे कोणतेच नियंत्रण नसल्याने मच्छीमारांचेही फावत असल्याचे दिसते आहे. त्यामुळे संरक्षित व दुर्मीळ सागरी जीवांबाबत केंद्र व राज्य सरकार उदासीन असल्याचे पुढे आले आहे.

महाराष्ट्र व मुंबईच्या किनारपट्टीवर गेल्या काही दिवसांमध्ये व्हेल, डॉल्फिन, टायगर शार्क, दुर्मीळ सॉ-फीश, अनेक ऑलिव्ह रिडले कासवे, सन फिश, स्टिंग-रे आदी दुर्मीळ सागरी जीव मृतावस्थेत आढळले आहेत. दरवर्षी असे दुर्मीळ व सागरी जीव सागरी किनाऱ्याला लागत असून त्यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणांमुळे झाला व ते कोणत्या जातीचे जीव आहेत. याबाबतचे कोणतेही वैज्ञानिक संशोधन राज्यात होताना दिसत नाही. व्हेल व डॉल्फिन यांसारखे मोठे सागरी जीव सागरी किनाऱ्यावर आले तर त्यांची तपासणी ही मुंबईतील कांदळवन संरक्षण विभागाकडून केली जाते. मात्र, अन्य छोटय़ा माशांबाबत असे संशोधन राज्यात दुर्दैवाने होत नाही. अशी खंत ‘सेंट्रल मरिन फिशरीज रिसर्च इन्स्टिटय़ूट’चे माजी संशोधक डॉ. विनय देशमुख यांनी व्यक्त केली. देशमुख यांच्या या वक्तव्याला राज्याच्या मत्स्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने देखील दुजोरा दिला आहे.

व्हेल व डॉल्फिन यांसारखे मोठे सागरी मासे राज्याच्या किनाऱ्यावर आले असता आमच्याकडून त्यांची नियमित पाहणी व तपासणी केली जाते. मात्र, त्यांच्या शरीरविच्छेदनासाठीची यंत्रणा सध्या उपलब्ध नाही. असे कांदळवन संरक्षण विभागाचे प्रमुख एन. वासुदेवन यांनी सांगितले.

याहून धक्कादायक बाब म्हणजे, किनाऱ्यावर येणाऱ्या दुर्मीळ माशांच्या मृत्यूला महाराष्ट्रातील यांत्रिक बोटीद्वारे मासेमारी करणारे मच्छीमार जबाबदार असल्याचे निरीक्षण सागरी अभ्यासकांनी नोंदवले आहे. राज्यात यांत्रिक बोटींद्वारे मासेमारी करणाऱ्या बोटींची संख्या ही १७ हजारांच्या आसपास असून यात पर्ससिन जाळ्यांद्वारे मासेमारी करणाऱ्या बोटींची संख्या ही जवळपास १ हजाराच्या घरात आहे. तसेच अनेक छोटे मच्छीमार हे ‘गील नेट’ या जाळ्याचा वापर करतात. या प्रकारच्या जाळ्यांमध्ये किंवा पर्ससिन जाळ्यांमध्ये अनेकदा संरक्षित मासे अडकतात. यात प्रामुख्याने डॉल्फिन, टायगर शार्क, दुर्मीळ सॉ-फिश, ऑलिव्ह रिडले कासवे, सन फिश, स्टिंग-रे हे मासे असतात. या जाळ्यांमधून या माशांची सुटका करताना हे मच्छीमार निष्काळजीपणे त्यांची जाळ्यातून मुक्त करतात. यात जखमी झालेले हे सागरी जीव मृत किंवा मृतप्राय अवस्थेत किनाऱ्याला लागतात. त्यामुळे राज्यातील मच्छीमारांच्या या बेशिस्त वर्तनामुळे पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये संरक्षित असलेल्या सागरी जीवांचा मृत्यू होत असल्याची बाब पुढे आली आहे.

वर्षभरातील घटना

  • २९ जानेवारी २०१६ – जुहू तारा रस्त्याजवळील किनाऱ्यावर ४० फुटी व्हेल मासा मृतावस्थेत आढळला.
  • फेब्रुवारी २०१६ – रत्नागिरीजवळील दाबोली किनाऱ्यावर ४० फुटी ब्लू व्हेल मासा आला असता त्याला पुन्हा सागरात सोडण्यात आले.
  • ७ ऑक्टोबर २०१६ – गुहागरच्या किनाऱ्यावर ३५ फुटी ब्लू व्हेल मासा मृतावस्थेत आढळला.
  • ११ सप्टेंबर २०१६ – जैतापूरजवळील माडबन गावानजिकच्या किनाऱ्यावरून ४७ फुटी ब्लू व्हेल माशाला सुखरूप पाण्यात सोडण्यात आले.
  • १ जानेवारी २०१७ – नरिमन पॉइंटजवळील किनाऱ्यावर ५ फुटी डॉल्फिन मृतावस्थेत आढळला.
  • १५ जानेवारी २०१७ – नरिमन पॉइंट येथील किनाऱ्यावर सागरी कासव आढळले.
  • २५ फेब्रुवारी २०१७ – वसईजवळील भुईगाव किनाऱ्यावर सागरी कासव आढळले.

खराब जाळी जीवावर

मुंबईसह महाराष्ट्राच्या समुद्रात मासेमारी करणारे मच्छीमार हे बहुतेकदा त्यांची वापरलेली मासे पकडण्याची जाळी समुद्रात फेकून देतात किंवा अनेकदा त्यांच्याकडून मासे पकडण्यासाठी समुद्रात टाकलेली जाळी सागरातील अंतर्गत प्रवाहांमुळे खोल सागरात वाहून जाते. अशी वाहून गेलेली जाळी किंवा मच्छीमार लोकांनी वापरून फेकलेली जाळी सागरतळाशी जाऊन बसते. नेमका याच भागात डॉल्फिन, सागरी कासवे, व्हेल यांचा अधिवास असतो. आणि या जाळ्यात अडकल्याने या सागरी जीवांना इजा होते किंवा त्यांचा मृत्यू होतो, अशी माहिती ‘सेन्ट्रल मरिन फिशरीज इन्स्टिटय़ूट’च्या एका संशोधकाने दिली. मात्र, दरम्यान लहान कोळी व गिल नेट वापरणाऱ्या मच्छीमारांमुळे सागरी जीवांचे मृत्यू होत नसून पर्ससिन जाळे वापरणाऱ्या मोठय़ा बोटीमुळे होत आहे. असे अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावर डॉल्फिन व अन्य संरक्षित सागरी जीवांना पकडले जात नाही. मात्र, अपघाताने जेव्हा हे मासे त्यांच्या जाळ्यात अडकतात तेव्हा त्यांची सुटका योग्यरीतीने केली जात नाही. त्याबद्दल या मच्छीमारांचे प्रबोधन व जागृती निर्माण करण्याची आवश्यकता आहे.

विनोद नाईक, मत्स्य विभागाचे सहआयुक्त

मोठे मासे अथवा सागरी कासवे यांना जाळ्यातून सोडविण्यासाठी प्रत्येक यांत्रिक बोटीवर मोठी खिडकी (एस्केप विंडो) असणे अपेक्षित आहे. मात्र, कोणत्याही बोटीवरील जाळ्यात अशी व्यवस्था नसते. त्याची पाहणी देखील सरकारकडून होत नाही. त्यामुळे या मच्छीमारांचे फावले आहे.

डॉ. दिनेश विन्हेरकर, सागरी कासवांच्या सुश्रूषा केंद्राचे संचालक