बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी संताप व्यक्त करताच गणेशोत्सवात जाहिरात झळकविण्याबाबत घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करण्याची वेळ पालिकेवर आली आहे. या संदर्भात येत्या दोन दिवसांत निर्णय जाहीर करण्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सोमवारी दिले.
गणेशोत्सव काळात बॅनरमुळे विद्रुपीकरण होत असल्याने अ‍ॅक्रॅलिकच्या १०><१० फूट आकाराच्या केवळ दोनच बॅनरवर जाहिरातदारांचे नाव आणि कंपनीचा लोगो झळकविण्यास मंडळांना परवानगी देण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. मात्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांच्यात सोमवारी झालेली बैठक वादळी ठरली. मंडळांना जाहिरातींच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशातूनच उत्सव साजरा होतो, सामाजिक उपक्रम राबवले जातात, तसेच महापालिकेलाही महसूल मिळतो आदी मुद्दे समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत उपस्थित केले.
न्यायालयाने अनधिकृत बॅनरवर कारवाई करण्याचे आदेश पालिकेला दिले आहेत. तसेच अधिकृत बॅनरचे धोरण निश्चित करण्यास पालिकेला सांगितले आहे. गणेशोत्सवातील बॅनरचा न्यायालयाच्या आदेशात उल्लेख नाही. पण न्यायालयाच्या आदेशाची भीती घालून पालिका प्रशासन उत्सवावरच गदा आणत असल्याचा आरोप समन्वय समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरेश दहीबावकर यांनी केला. या पूर्वी गणेशोत्सवात ज्या पद्धतीने जाहिराती लावण्यास परवानगी देण्यात येत होती, तशीच ती भविष्यातही द्यावी, अशी मागणी दहीबावकर आणि विनोद घोसाळकर यांनी केली. तर या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा आ. मंगलप्रभात लोढा यांनी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांची भेट घेऊन दिला.
या संदर्भात सीताराम कुंटे, महापौर सुनील प्रभू, सर्व पक्षांचे गटनेते यांच्याशी चर्चा करून येत्या बुधवारी होणाऱ्या बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या बैठकीत बॅनरबाबतचा निर्णय जाहीर करण्यात येईल, असे आश्वासन मोहन अडतानी यांनी दिले.

जाहिरातदारांची नावे केवळ दोन बॅनर्सवर झळकविण्यास परवानगी देण्याच्या निर्णयाला मंडळांनी विरोध केल्यामुळे आता मंडप स्थळापासून ठरावीक अंतरावर बॅनर लावण्यास परवानगी देण्याचा विचार महापालिका अधिकारी करत आहेत. त्यामुळे मुंबईच्या विद्रुपीकरणास काही अंशी आळा बसेल, असे या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

न्यायालयाचा अवमान होणार नाही, याची काळजी घेऊन पालिकेने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना जाहिरात प्रदर्शनाची परवानगी द्यावी. तसेच त्या अनुषंगाने महापालिकेचे धोरण घोषित करावे.
– सुनील प्रभू, महापौऱ