निशांत सरवणकर

‘खाकी वर्दीतली माणसे’ म्हणून पोलीस दलाकडे पाहिले जात असले तरी, शिपाई ते साहाय्यक उपनिरीक्षकापर्यंतच्या कर्मचाऱ्यांच्या गणवेशातील खाकीच्या वेगवेगळय़ा छटा या नेहमीच खटकत असतात. विशेषत: पोलीस संचलनाच्या वेळी गणवेशाच्या कापडाच्या या भिन्न छटा ही विसंगती अधिक ठळकपणे दाखवून देतात. या पाश्र्वभूमीवर, पोलिसांच्या गणवेशासाठी एकच छटा असलेले खाकी कापड वापरण्याचा निर्णय राज्य पोलीस दलाने घेतला आहे. पोलीस मुख्यालयाकडून यासाठी कापडखरेदी केली जाणार आहे.

राज्य पोलीस दलातील सव्वा दोन लाख कर्मचाऱ्यांपैकी दोन लाखांच्या आसपास शिपाई ते सहायक उपनिरीक्षक आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना गणवेशासाठी दरवर्षी पाच हजार १६७ रुपये दिले जात असत. या रकमेत पोलिसांनी गणवेशासाठी कापड खरेदी करणे, शिलाई तसेच काठी खरेदी करणे अपेक्षित आहे. ही रक्कम अपुरी असली तरी पोलिसांना याच रकमेत किमान दोन गणवेश तयार करावे लागत असत. बऱ्याच वेळा पदरमोड करूनही पोलिसांना गणवेशाची व्यवस्था करावी लागत असे. अशा वेळी या पोलिसांकडून कमी दर्जाचे कापड खरेदी केले जात असे. त्यामुळे प्रत्येक पोलिसाच्या खाकीची रंगछटा बदलत असे. तो एकच असावा, असे राज्य पोलीस दलाला वाटत असून त्यातूनच गणवेशासाठी विशिष्ट दर्जाचे कापड खरेदी करण्याचे निश्चित करण्यात आल्याचे राज्य पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. गणवेशासाठी कापड आणि विशिष्ट काठी पुरविली जाणार असल्यामुळे दरवर्षी पोलिसांना मिळणारा भत्ता बंद केला जाणार असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.

उपनिरीक्षक ते वरिष्ठ पदावरील अधिकारी खाकी गणवेशाची खरेदी करताना काळजी घेताना दिसतात. त्यामुळे त्यांच्या खाकीच्या रंगात शक्यतो बदल आढळत नाही. मात्र शिपाई ते सहायक निरीक्षकपर्यंतचे पोलीस खरेदी करताना गणवेशाच्या दर्जाची वा खाकी रंगाची इतकी काळजी घेत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे एकाच पोलीस ठाण्यात शिपायांचे गणवेश वेगळे भासत असत. ते एकच असावे, असे वाटून राज्य पोलिसांनी खाकी कापड खरेदी करण्याचा निर्णय गेल्या वर्षी घेतला होता. याबाबत आता निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून खाकी कापड पुरविणाऱ्या कंत्राटदारांना नमुना सादर करण्यात सांगितले आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खाकी कापड शिपाई ते सहायक उपनिरीक्षकांना दिले जाणार आहे.