लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : उत्तीर्णांचे वाढलेले प्रमाण आणि त्याचवेळी अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढलेली संख्या यांमुळे मुंबई विभागांत विज्ञान शाखेच्या प्रवेशाचे पात्रता गुण (कट ऑफ) वाढण्याची शक्यता आहे. त्याचवेळी मुंबईत सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेल्या वाणिज्य शाखेतील प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची संख्या घटल्यामुळे त्याच्या प्रवेशासाठीची स्पर्धा किंचित कमी होऊ शकेल. यंदा मुंबई विभागाचा एकूण निकाल ९१.९५ टक्के लागला.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. यंदा मुंबई विभागाचा निकाल राज्यात सर्वात कमी म्हणजे ९१.९५ टक्के लागला आहे. मात्र, विभागाच्या निकालात गतवर्षीच्या तुलनेत ३ टक्क्यांनी वाढ झाली असून २०२३ साली निकालाची एकूण टक्केवारी ८८.१३ आणि २०२२ साली ९०.९१ इतकी होती. मुंबई विभागात ठाणे, रायगड, पालघर, बृहन्मुंबई, मुंबई पश्चिम उपनगरे आणि मुंबई पूर्व उपनगरे यांचा समावेश आहे. यंदा मुंबई विभागातून इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी एकूण ३ लाख २१ हजार ११६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३ लाख १९ हजार ९१० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि २ लाख ९४ हजार १५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदा विभागाच्या विज्ञान, कला आणि व्यावसायिक शिक्षण शाखेच्या निकालात वाढ झाली आहे तर विभागाचा वाणिज्य शाखेतील निकाल काहिसा घटला आहे.

आणखी वाचा-मुंबई : म्हाडाच्या जागेवरील अनधिकृत फलक म्हाडा हटविणार

विज्ञान शाखेच्या प्रवेशाची अटीतटी

गेल्यावर्षी मुंबईतील एकूण उत्तीर्णांची टक्केवारी कमी झाली असली तरी विशेष श्रेणी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे नामांकित महाविद्यालयांतील प्रवेशासाठी चढाओढ होती. काही महाविद्यालयांतील प्रवेशासाठी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुणही अपुरे ठरले. प्रवेशाच्या या स्पर्धेत यंदा अधिकच वाढ होण्याची शक्यता आहे. यंदा विशेष श्रेणी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही जवळपास ७ हजारांनी वाढली आहे. यंदा मुंबई विभागात ४५ हजार ९७२ विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी मिळाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा विज्ञान शाखेतील पदवी प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे तेथे प्रवेशासाठी चुरस असेल.

विज्ञान शाखेतील पदवी प्रवेश पात्र विद्यार्थी यंदा १ लाख १२ हजार ९७९ आहेत तर गेल्यावर्षी ९६ हजार ४२४ होते. विज्ञान शाखेच्या निकालाची वाढ ५ टक्के आहे. वाणिज्य आणि कला शाखेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या मात्र गेल्यावर्षीच्या तुलने घटली आहे. वाणिज्य शाखेतील उत्तीर्णांची संख्या १ लाख ४३ हजार ६२८ असून गेल्यावर्षी ही संख्या १ लाख ५१ हजार १९४ होती. कला शाखेच्या रिक्त जागांमध्येही यंदा भर पडण्याची शक्यता आहे. यंदा मुंबई विभागाच्या कला शाखेच्या निकालाची टक्केवारी वाढली असली तरी या शाखेतून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काहिशी घटल्यामुळे प्रवेशासाठी पात्र विद्यार्थीही गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी आहेत. यंदा ३३ हजार ८१२ विद्यार्थी कला शाखेतून उत्तीर्ण झाले आहेत. गेल्यावर्षी ही संख्या ३८ हजार ३७३ होती.

आणखी वाचा-‘होम प्लॅटफॉर्म’ नसताना घाटकोपर-सीएसएमटी लोकल चालवणे गंभीर, लोकलचा विस्तार करण्याचे प्रवासी संघटनेचे मत

मुंबई विभागात रायगड जिल्हा अव्वल, तर बृहन्मुंबईचा निकाल सर्वात कमी

इयत्ता बारावीच्या निकालात मुंबई विभागाअंतर्गत रायगड जिल्ह्याचा सर्वाधिक ९४.८३ टक्के निकाल लागला आहे. तर सर्वात कमी बृहन्मुंबई ८९.०६ टक्के इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तसेच पालघर जिल्ह्यात ९३.५१ टक्के, ठाण्यात ९२.०८ टक्के, मुंबई पश्चिम उपनगरमध्ये ९१.८७ टक्के, मुंबई पूर्व उपनगरमध्ये ९०.३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

शाखानिहाय उत्तीर्णांची टक्केवारी (कंसात गेल्यावर्षीची टक्केवारी)

विज्ञान – ९६.३५ (९१.१८)
वाणिज्य – ९०.८८ (८८.१५)
कला – ८३.५६ (८०.८७)
व्यवसाय शिक्षण – ९०.८५ (९१.५८)

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Race for science admissions up 3 percent increase last year mumbai print news mrj