लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : शीव-पनवेल मार्गामधील चुनाभट्टी येथे असलेल्या नाल्याची पालिकेकडून यावर्षी आद्यपही सफाई करण्यात आलेली नाही. परिणामी या पावसाळ्यात चुनाभट्टी आणि कुर्ला परिसरात पाणी तुंबण्याची भीती व्यक्त करण्यात येत असून पालिकेने तत्काळ या नाल्याची सफाई करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

मे महिना संपत आलेल्या असताना देखील शहरातील अनेक नाल्यांची यावर्षी पालिकेकडून सफाई करण्यात आलेली नाही. परिणामी अनेक ठिकाणी यावर्षी मोठ्या प्रमाणात पाणी तुंबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चुनाभट्टी येथील राहुल नगर १ येथून वाहणाऱ्या नाल्याची देखील पालिकेकडून आद्यपही सफाई करण्यात आलेली नाही. कुर्ला कसाईवाडा, चुनाभट्टी, वडाळा असा हा नाला वाहतो. मात्र मे महिना संपत आलेला असतानाही या नाल्याची आद्यपही सफाई करण्यात आलेली नाही.

आणखी वाचा-मुंबई : रस्त्यांची कामे ७ जूनपर्यंत पूर्ण न झाल्यास कंत्राट रद्द करा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचा आदेश

सध्या या नाल्यात जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढल्या असून कचऱ्याचे ढीगही मोठ्या प्रमाणात जमा झाले आहेत. त्यामुळे मोठा पाऊस झाल्यास कुर्ला आणि चुनाभट्टी परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. याबाबत माजी नगरसेवक कप्तान मलिक यांनी पालिकेला पत्र लिहून तत्काळ या नाल्याची सफाई करण्याची मागणी केली आहे.

घाटकोपरमध्ये सफाई नाही

घाटकोपर-विद्याविहार पूर्व येथील सोमय्या नालादेखील सध्या कचऱ्याने पूर्णपणे भरला आहे. तेथेही आद्यप सफाईला सुरुवात झालेली नाही. परिणामी पावसाळ्यात नाल्यालगत असलेल्या चित्तरंजन कॉलनी, एम आय जी कॉलनी, शास्त्री नगर जवाहर नगर, मोहन नगर, राजावाडी सी बी सी महानगर पालिका शाळा, राजावाडी रुग्णालय परिसर आदि ठिकाणी पाणी तुंबण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेने तत्काळ येथील नाल्याची सफाई करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्येकर्ते प्रकाश वाणी यांनी केली आहे.