सीएसटी मृत्यूप्रकरणी शवविच्छेदन अहवालावर भिस्त
मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसमधील विश्रांतीगृहात अस्वस्थ वाटल्यानंतर एका महिलेचा मृत्यू झाल्याने या प्रकरणी रेल्वे प्रशासनावर ठपका ठेवला जात आहे. मात्र, या खोलीत कीटकनाशकांची फवारणी महिलेच्या मृत्यूच्या दहा दिवस आधी करण्यात आली होती. तसेच या खोलीत या महिलेच्या आधी आठ लोक राहून गेले होते. त्यांना काहीच त्रास झाला नाही, असा खुलासा रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे. त्यामुळे या महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे उत्तर शवविच्छेदन अहवालानंतरच मिळणार आहे.
मेंगलोर एक्स्प्रेसने मुंबईत आलेल्या एका दाम्पत्याने २२ एप्रिलच्या रात्री सीएसटी येथील विश्रांतीगृहातील एका खोलीत मुक्काम केला होता. या दाम्पत्याला अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना खोलीही बदलून देण्यात आली. मात्र, दुसऱ्या दिवशी दुपारी या जोडप्याला अधिकच अस्वस्थ वाटू लागले आणि दाम्पत्यापैकी महिलेची शुद्ध हरपली होती. तिला रुग्णालयात दाखल करण्याआधीच तिचा मृत्यू झाला होता. या विश्रांतीगृहात पेस्ट कंट्रोल केले असून, दोन दिवस आधी आणखी एका प्रवाशाला अस्वस्थ वाटल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याबाबत लोहमार्ग पोलिसांनी रेल्वेकडे विचारणाही केली होती.