अधिकाऱ्यांकडून हक्काची रजा नाकारली जाणे, कर्मचाऱ्यांशी उद्धटपणे वागणे आदी गोष्टींमुळे संतप्त झालेल्या पश्चिम रेल्वेच्या उपनगरी गाडय़ांच्या गार्ड्सनी बुधवारी रात्रीपासून नियमानुसार काम आंदोलन पुकारले. यामुळे गुरुवारी सकाळपासून वाहतूक विस्कळीत झाली होती.
चर्चगेट येथील क्षेत्रीय अधिकारी संजीव निगम यांच्या वागण्यामुळे गार्ड्स नाराज झाले असून त्यांनी निगम यांच्या विरोधात तक्रारी केल्या होत्या. मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे गार्ड्सचे म्हणणे आहे. साध्या किरकोळ रजाही निगम यांनी देण्यास नकार दिला होता. अखेर बुधवारी रात्रीपासून गार्ड्सनी ओव्हरटाइम घेणे बंद केले आणि ‘नियमानुसार काम’ करण्यास सुरुवात केली. याचा परिणाम सकाळी जाणवू लागला. पश्चिम रेल्वेची उपनगरी वाहतूक सकाळपासूनच १५ ते २० मिनिटे विलंबाने सुरू होती. अखेर पश्चिम रेल्वेच्या सह विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी मध्यस्थी करून या प्रकरणी आपण योग्य ती कारवाई करू, असे आश्वासन दिल्यानंतर गार्ड्सनी आपले आंदोलन मागे घेतल्याचे सांगण्यात आले.  मात्र सायंकाळी उशिरापर्यंत वाहतूक विस्कळीत होती. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.