नोव्हेंबपर्यंत वेळापत्रक सुधारण्याचे रेल्वेमंत्र्यांचे आदेश

विविध कारणांमुळे विलंबाने धावणाऱ्या लांबपल्ल्याच्या गाडय़ा, त्यामुळे होणारा लोकलसेवेचा खोळंबा याची केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी गंभीर दखल घेतली आहे. मुंबईतील मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील गाडय़ांचा वक्तशीरपणा ७० टक्क्यांवर आला असून तो येत्या नोव्हेंबपर्यंत ९० टक्के झाला पाहिजे, असा सज्जड दम गोयल यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला आहे.

लांबपल्ल्याच्या गाडय़ांना होणाऱ्या खोळंब्याचा परिणाम मुंबईतील लोकलच्या वेळापत्रकावर होतो. मध्य रेल्वेच्या गाडय़ांच्या वक्तशीरपणाची सरासरी टक्केवारी देशात ७२.३३ आहे. त्यामुळे रेल्वेच्या देशातील ६९ विभागांमध्ये मध्य रेल्वे वक्तशीरपणात ५५व्या क्रमांकावर आहे. त्यातल्या त्यात पश्चिम रेल्वे लांब गाडय़ांच्या आणि पर्यायाने लोकलच्या वक्तशीरपणात बरीच पुढे आहे. मात्र रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी गुरुवारी घेतलेल्या बैठकीत पश्चिम, मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत रेल्वेचे बिघडलेले वेळापत्रक सुधारण्याचे आदेश दिले आहेत. गाडय़ांचा वक्तशीरपणा नोव्हेंबरपासून ९० टक्क्यांपेक्षा पुढे नेण्यात यावा, अशी सूचना त्यांनी केली आहे.

मध्य व पश्चिम रेल्वेवरील लांबपल्ल्याच्या व लोकल गाडय़ांचे वेळापत्रक गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने बिघडत चालले आहे. गर्दीच्या वेळी वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांची रखडपट्टी होते.  मुंबईत उशिराने येणाऱ्या लांबपल्ल्याच्या गाडय़ांमुळे त्याचा परिणाम लोकलच्या वेळापत्रकावर होतो. ऑगस्ट महिन्यात मध्य रेल्वेची मुंबई विभागातील मेल-एक्स्प्रेसची कामगिरी ७०.९३ टक्क्यांपर्यंत होती. इतर ६९ विभागांच्या तुलनेत ती ५५व्या क्रमांकावर होती. तुलनेत पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेन्ट्रल विभागाची कामगिरी ९४ टक्क्यांपर्यंत राहिली आणि ते आठव्या क्रमांकावर आहे. परंतु, काही महिन्यांमध्ये तीही कामगिरी घसरली आहे. गंमत म्हणजे कोकण रेल्वेही ९२ टक्केवारीसह आघाडीवर राहिली आहे.

आता मध्य रेल्वेला वक्तशीरपणाची टक्केवारी ९० टक्क्यांपुढे नेण्याचे आव्हान असेल. रेल्वे वेळापत्रकात सुधारणा करून त्याची टक्केवारी नोव्हेंबर, २०१८ पासून ९० टक्क्यांपेक्षा जास्त पुढे नेण्याची सूचना पीयूष गोयल यांनी रेल्वे प्रशासनाला केली आहे. त्यामुळे रेल्वेला तातडीने उपाययोजना कराव्या लागणार आहेत.

स्वच्छतेसाठी मोहीम

मुंबईतील बहुतांश रेल्वे स्थानके विशेषत: प्रसाधनगृहे अस्वच्छ असल्याचे दिसून येते. त्यामुळे स्वच्छतेवरही भर देण्याचे आदेश रेल्वेमंत्र्यांनी मध्य, पश्चिम व कोकण रेल्वेला दिले आहेत. २ ऑक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त सफाई मोहीम राबविण्यात येईल. पण त्याआधीच विशेष मोहीम घेऊन स्वच्छता करण्यात यावी, असे आदेश गोयल यांनी दिले आहेत.

लांबपल्ल्याच्या वक्तशीरपणाची टक्केवारी

  • भावनगर – ९९.३५ टक्के
  • रांची – ९८.९९ टक्के
  • नागपूर – ९५.४४ टक्के
  • मुंबई सेंट्रल – ९५.०४ टक्के
  • पुणे – ९४.९२ टक्के