मध्य रेल्वे मार्गावर वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडांमुळे गैरसोयीला सामोरे जावे लागणाऱ्या प्रवाशांचा संतापाचा शुक्रवारी बदलापूर स्थानकावर कडेलोट झाला. बदलापूर स्थानकावर गेल्या पाच तासांपासून संतप्त प्रवाशांनी मध्य रेल्वेची वाहतूक रोखून धरली आहे. रेल्वे प्रशासन आणि पोलिसांकडून शांततेचे आवाहन करूनही प्रवाशांच्या संतापाचा पारा काही केल्या कमी होण्यास तयार नाही. त्यामुळे आता खुद्द केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनीच याप्रश्नी पुढाकार घेऊन प्रवाशांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. प्रवाशांनी हे आंदोलन थांबवावे आवाहन रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी केले आहे. रेल्वेचे जीएम, डीआरएम आणि बाकीच्या अधिकाऱ्यांना बदलापूरला पाठवण्यात आल्याची माहिती सुरेश प्रभूंनी ट्विटरवरून दिली आहे. तसेच यंत्रणेत सुधारणा करण्यात आल्याचे माहितीही प्रभू यांनी दिली आहे.
भिवपुरी येथे सिग्नल यंत्रणेत झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे आज सकाळी ५.०५ मिनिटांची मुंबईकडे येणारी ट्रेन बदलापूर स्थानकात उशिरा पोहचली. त्यामुळे बदलापूर स्थानकात गाडीसाठी ताटकळत असलेले प्रवाशी संतप्त झाले. त्यानंतर या प्रवाशांना रेल्वे ट्रॅकवर उतरून अप आणि डाऊन दोन्ही दिशेची वाहतूक रोखून धरली आहे. तसेच प्रवाशांनी स्टेशन मास्तरांच्या कार्यालयालाही घेराव घालत संतप्त भावना व्यक्त केल्या. यापुढे गाडी वेळेवर येईल असे लिहून द्या, अशी मागणी करत प्रवाशी अडून बसले आहेत. या सगळ्या गोंधळामुळे गेल्या अडीच तासांपासून मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. त्यामुळे सकाळच्या वेळेत चाकरमान्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.