’ सोमवारच्या ‘ओव्हरहेड वायर’ बिघाडानंतर कारवाई
गाडीच्या टपावरून प्रवास करणारे प्रवासी हे रेल्वेसाठी डोकेदुखी ठरत असतानाच सोमवारी अशाच एका प्रवाशामुळे ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड होण्याची घटना घडली. ऐन गर्दीच्या वेळी झालेला हा बिघाड दुरुस्त होण्यासाठी तब्बल ४० मिनिटांपेक्षा जास्त कालावधी लागल्याने हार्बर मार्गावरील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला होता. गाडीच्या टपावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात सातत्याने कारवाया केल्या जात असल्या, तरी आता या ‘छपरी’ प्रवाशांना चाप लावण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल विशेष मोहीम हाती घेणार आहे. हार्बर मार्गावर ही मोहीम पुढील दोन आठवडे चालणार आहे.
हार्बर मार्गावर चेंबूर ते टिळक नगर या दरम्यान सोमवारी ओव्हरहेड वायर प्रणालीत बिघाड झाला. गाडीच्या टपावरून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचा धक्का लागून ओव्हरहेड वायर प्रणालीतील एक नलिका तुटल्याने गाडी खोळंबली होती. या बिघाडामुळे तब्बल ३० सेवा रद्द आणि ५६ सेवा दिरंगाईने सुरू होत्या. या वेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमिताभ ओझा यांनी घटनास्थळाला भेट दिली असता टपावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची समस्या त्यांच्या लक्षात आली. अशा प्रकारे प्रवासी प्रवास करत असतील, तर त्याला आळा घालायला हवा, असे मत त्यांनी व्यक्त केले.
एवढय़ावरच न थांबता आपण रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांना तसे आदेश दिल्याचेही विभागीय रेल्वे व्यवस्थापक ओझा यांनी स्पष्ट केले. या आदेशांनुसार आता वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे योजना आखत आहेत. हार्बर मार्गावर डीसी विद्युतप्रवाहावर गाडय़ा धावतात. इतर ठिकाणी एसी विद्युतप्रवाहावर धावणाऱ्या गाडय़ांच्या ओव्हरहेड वायरच्या जवळ व्यक्ती गेली, तरीही तिला विजेचा जोरदार झटका बसतो. डीसी विद्युतप्रवाहात ते शक्य नसल्याने प्रवाशांना टपावरून प्रवास करणे शक्य होते. या टपावरून प्रवास करणाऱ्यांमध्ये गोवंडी, मानखुर्द अशा ठिकाणी चढणाऱ्या युवकांचा भरणा जास्त असतो. आता या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी हार्बर मार्गावर अतिरिक्त कुमक नेमून योजना आखण्यात येणार आहे. पुढील दोन आठवडे या ‘छपरी’ प्रवाशांविरोधात कठोर मोहीम राबवण्यात येणार असून भारतीय रेल्वे कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे सचिन भालोदे यांनी स्पष्ट केले.