राज ठाकरे यांचे टीकास्त्र; अपयश झाकण्यासाठी भावनिक वाद
‘भाजपची सत्ता येऊनही परिस्थितीत काहीच फरक पडलेला नाही. त्यांचाही कारभार काँग्रेससारखाच सुरू आहे. आपले अपयश झाकण्याासाठी भाजप नेते ‘भारत माता की जय’ आणि देशभक्तीचे धडे देत आहेत’, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपवर टीकास्त्र सोडले. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याचे निमित्त साधत राज यांनी सत्ताधाऱ्यांवर चौफेर टीका केली.
शिवाजी पार्क येथे मनसेतर्फे प्रथमच गुढीपाडवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. राज या मेळाव्यात नेमके काय बोलतात, याकडे साऱ्यांचेच लक्ष होते. जनतेला ‘अच्छे दिन’ची स्वप्ने दाखवत सत्तेवर आलेल्या भाजपने केसाने गळा कापला असल्याची टीका करीत ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रामुख्याने लक्ष्य केले. राज ठाकरे पुढे म्हणाले, ‘पाकिस्तानला विरोध करून भाजपने सत्ता पटकावली. पण मोदी नंतर बदलले. अजूनही समझोता एक्सप्रेस, लाहोर बससेवा सुरू आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोदी पाकिस्तानला गेले आणि पठाणकोटवर अतिरेक्यांनी हल्ला चढविला. आता भाजप नेते ‘भारत माता की जय’ आणि देशभक्तीचे धडे देत आहेत. पण भारतविरोधी घोषणा देणाऱ्यांचे समर्थन करणाऱ्या पीडीपीबरोबर काश्मीरमध्ये भाजप सत्तेत सहभागी झाले आहे.

राज म्हणाले..
* पोटदुखीमुळे शिवसेनेने सभास्थानाजवळ झेंडे लावले तरी हा बाळासाहेबांचा आशीर्वाद
* परप्रांतीयांच्या लोंढय़ामुळे पाणी, वाहतूक, फेरीवाल्यांचा प्रश्न
* भाजप किंमत देत नसेल, तर शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे
* शहरांमधील मराठी टक्का कमी करण्याचे भाजपचे षड्यंत्र

राममंदिर कुठे?
राममंदिर उभारणीचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजपने आता हा मुद्दा न्यायालयात असल्याचे कारण देऊन सोडला. बाबरी मशीद पाडल्यानंतर दंगली उसळल्या, हजारो लोक मृत्युमुखी पडले आणि आता मंदिराचे नावही भाजप घेत नाही. भाजपने आंदोलन सोडले, मी कोणतेही आंदोलन सोडले नाही, असे ठाकरे यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री म्हणजे वर्गातील ‘मॉनिटर’
सराफांचे आंदोलन, शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. मात्र, तरी मुख्यमंत्री ठोस भूमिका घेत नाहीत, असे सांगत फडणवीस हे वर्गातील ‘मॉनिटर’सारखे शोभतात, अशी खिल्ली राज यांनी उडवली. प्रशासनावर त्यांचा वचक नसल्याची टीकाही त्यांनी केली.

मुंबई आणि अन्य शहरांचा मराठी चेहरा पुसण्याचे भाजपचे षड्यंत्र आहे. मात्र, महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही.
राज ठाकरे, मनसे अध्यक्ष