मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. स्थानिक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा अमृता फडणवीस यांना राज ठाकरेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी राज ठाकरे म्हणजे मनोरंजन…मनोरंजन…मनोरंजन असल्याचे उत्तर दिले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मोठया बंधु समान असल्याचे अमृता यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलच्या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, या वयात शरद पवार काम करत आहेत. त्यांना ‘अभी तो में जवान हूँ’ हे गाणे सूट होते. मागच्या महिन्यात अमृता फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपिता म्हणाल्या होत्या. त्यावरुन वाद झाला होता. पण आजही त्या आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत.

आपले पती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्या ‘मिस्टर इंडिया’ म्हणतात. देवेंद्र फडणवीस यांना आम्ही घरी पाहत नाही. आमच्यासाठी ते मिस्टर इंडिया आहेत असे अमृता म्हणाल्या. सप्टेंबर महिन्यात काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख नाना पटोल यांनी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्नीची अॅक्सिस बँकेच्या उपाध्यक्षपदी वर्णी लावण्यासाठी सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता. मुंबई-गोवा क्रूझ शिपवरील सेल्फीमुळेही अमृता फडणवीस वादात सापडल्या होत्या.