scorecardresearch

राणे पितापुत्राला अटकपूर्व जामीन; राजकीय हस्तक्षेपाचे प्रकरण असल्याचे न्यायालयाचे ताशेरे

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिची मृत्यूपश्चात बदनामी आणि चारित्र्यहनन केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांना दिंडोशी न्यायालयाने बुधवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला.

NITESH RANE AND NARAYAN RANE
नितेश राणे आणि नारायण राणे (फाईल फोटो)

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिची मृत्यूपश्चात बदनामी आणि चारित्र्यहनन केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांना दिंडोशी न्यायालयाने बुधवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला. तसेच दोघांना जामीन मंजूर करताना हे प्रकरण राजकीय हस्तक्षेपाचे असल्याचे ताशेरेही ओढले.

राणे पितापुत्राला अटक झाल्यास प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या बंधपत्रावर त्यांची सुटका करण्याचे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. यू. बघेले यांनी दिले. राणे पितापुत्राला अटकपूर्व जामीन मंजूर करताना दोघांनीही पुरावे नष्ट करू नयेत आणि साक्षीदारांवर कोणत्याही पद्धतीचा दबाव आणू नये, असे आदेश दिले. त्याच वेळी हे प्रकरण सुरू करण्यामध्ये राजकीय सहभाग असण्याची शक्यता असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.

या प्रकरणी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात आली. हा आणि अन्य काही मुद्दे या ठिकाणी लक्षात घेतलेले नाहीत. परंतु सकृद्दर्शनी तपास यंत्रणेने हे प्रकरण ज्या अभूतपूर्व पद्धतीने हाताळले आहे, ते विचारात घेता हे प्रकरण राजकीय हस्तक्षेपाचे असल्याच्या राणे पितापुत्राच्या दाव्यात तथ्य दिसते, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले. तपास यंत्रणांना सरकारच्या आधिपत्याखाली काम करावे लागते हे दुर्दैवी आहे, असे ताशेरेही न्यायालयाने ओढले. तपास यंत्रणा पूर्ण स्वतंत्र हव्यात आणि त्या सत्ताधाऱ्यांच्या हातातील बाहुले बनणार नाहीत याची खात्री असायला हवी, असेही न्यायालयाने नमूद केले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rane granted pre arrest bail court ruled case of political interference ysh