यंदा तुटवडा जाणवणार; ‘नाईट फ्रँक’ अहवालातील होरा

मंदीत असलेल्या बांधकाम व्यवसायाला निश्चलनीकरण, रिअल इस्टेट कायद्याचा फटका बसल्याने यंदा तयार घरांचा कमालीचा तुडवडा जाणवणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. बांधकाम व्यवसायातील अस्थिरतेमुळे ग्राहकांनीही आता तयार घरांकडेच अधिक कल दाखविला आहे. जुनी घरे विकत घेण्यालाही ग्राहकांनी पसंती दिली आहे. देशातील बांधकाम व्यवसायातील विविध घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्या नाईट फ्रँक या कंपनीने अलीकडे जारी केलेल्या सहामाही अहवालात यावर प्रकाशझोत टाकला आहे.

गेले वर्ष बांधकाम व्यवसायाला फारच घडामोडींचे गेले. नोव्हेंबर २०१६ मध्ये निश्चलनीकरण झाल्यानंतर रोखीचा प्रचंड तुडवडा निर्माण झाला आणि त्याचे पडसाद बांधकाम व्यवसायावर उमटले. अनेक छोटय़ा बांधकाम व्यावसायिकांनी काढता पाय घेतला. अनेक बडय़ा विकासकांनी अनेक छोटे प्रकल्प आपल्या ताब्यात घेतले. रिअल इस्टेट कायद्यानुसार नोंदणी बंधनकारक करण्यात आल्यानंतर नवीन प्रकल्प घोषित करण्यापेक्षा अर्धवट प्रकल्प पूर्ण करण्यावर विकासकांनी भर दिला. त्यामुळे गेल्या वर्षांत नवे प्रकल्प घोषित होण्याच्या संख्येत कमालीची घट झाली. २०१६ अखेरीस ३४ हजार १९० घरांचे प्रकल्प घोषित झाले होते. २०१७ अखेरीस ही संख्या २३ हजार २५३ अशी घसरली. नवे प्रकल्प घोषित होण्यात ३२ टक्क्यांची घट झाल्याचे हा अहवाल सांगतो.

विकासकांनी सध्या तयार असलेल्या घरांची विक्री करण्यावर भर दिला आहे. विविध प्रकारच्या सवलती देऊन विकासकांनी घरांची विक्री केली. नाईट फ्रँकच्या अहवालानुसार, घरांच्या विद्यमान किमतीत पाच टक्के कमी झाल्याचे आढळून आले. २०१७ च्या पहिल्या सहामाहीत निवासी घरांची विक्री चांगली झाली.  या अहवालानुसार, २०१७ मधील पहिल्या सहामाहीत ३० हजार १७९ घरांची विक्री झाली. वर्षअखेरीस ६२ हजार २५६ घरे विकली गेली. २०१६ मध्ये ६० हजार ३७४ घरांची विक्री झाली होती. निश्चलनीकरण आणि रिअल इस्टेट कायद्याच्या अमलबजावणीनंतरही घरांच्या विक्रीत तीन टक्के वाढ झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. मुंबई महानगर परिसरात २०१६ अखेर विक्री न झालेल्या घरांची संख्या एक लाख ५४ हजार ९६७ होती. २०१७ अखेर ती एक लाख १५ हजार ९६४ अशी नोंदली गेली. यापैकी ३९ हजार घरांची विक्री झाल्याचे या अहवालात नमूद आहे.

विक्री न झालेली घरे विकण्यावर विकासकांचा भर दिसून आला. त्यामुळे सर्वसाधारण किमतींत पाच टक्क्यांची घट आढळून आली. घरांच्या किमती साधारणत: पाच ते नऊ टक्क्यांनी कमी झाल्या, तसेच विविध सवलतींचाही ग्राहकांना लाभ मिळाला. यापुढेही घरांच्या किमतींमध्ये ग्राहकांना लाभ मिळू शकेल, असा अंदाज आहे.

सामंतक दास, राष्ट्रीय प्रमुख, संशोधन विभाग, नाईट फ्रँक