पूर्व उपनगरांत १३८६ घरे मिळणार; ४१५ कोटींचा खर्च

मुंबई : पालिकेच्या घनकचरा विभागातील सफाई कामगारांच्या वसाहतींच्या पुनर्विकासावरील राजकीय वाद शमलेला नसताना आता आणखी दोन ठिकाणच्या वसाहतींचा विकास करण्याबाबत स्थायी समितीत प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. चेंबूर आणि मानखुर्दमधील या वसाहतींचा पुनर्विकास करून १३८६ घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पालिका यासाठी ४१५ कोटींचे कंत्राट देणार आहे. 

पालिकेच्या घनकचरा विभागांतर्गत असलेल्या सफाई कामगारांच्या ३९ वसाहती मुंबईत आहेत. या वसाहतींच्या पुनर्विकासासाठी पालिकेने आणलेल्या आश्रय योजनेच्या कामाचा आणखी एक प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर ठेवण्यात आला. यापूर्वी प्रभादेवी व माहीम येथील वसाहतीच्या विकासाचे प्रस्ताव आले होते. त्या वेळी नियमबाह्य पद्धतीने काम दिल्यामुळे भाजपने या प्रस्तावांना विरोध केला. मात्र त्यापैकी १७०० कोटींच्या कामाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला तर ४७८ कोटींच्या कामाचा प्रस्ताव परत पाठवण्यात आला होता. आता आणखी काही वसाहतींच्या विकासाचे दोन प्रस्ताव आल्यामुळे त्यालादेखील राजकीय विरोध होतो का ते येत्या बैठकीत समजणार आहे.

या प्रस्तावानुसार पालिका पूर्व उपनगरांत १,३८० घरे बांधणार आहे. यामध्ये ३०० चौरस फुटांची १२७० तर ६०० चौरस फुटांची ११६ घरे बांधणार आहे. यासाठी पालिका सुमारे ४१५ कोटींचा खर्च करणार आहे.

शहर व उपनगरांमध्ये सफाई कामगारांच्या ४६ वसाहती असून यामध्ये २९,६१८ सफाई कामगारांपैकी ५५९२ सफाई कामगारांना सेवा निवासस्थाने देण्यात आली आहेत. या चाळी इमारती १९६२च्या कालावधीतल्या असून निवासस्थानाचे क्षेत्रफळ सुमारे १५० चौरस फूट असल्याने कामगारांच्या कुटुंबीयांना ही जागा अपुरी ठरते. त्यामुळे त्यांचा पुनर्विकास करण्यात येत आहे.

पुनर्विकास असा होणार..

देवनार येथील ४०१८ चौरस मीटर भूखंडावर सद्य:स्थितीत ११६ सदनिका आहेत. या ठिकाणी ३०० चौरस फुटांच्या ३७३ तर ६०० चौरस फुटांच्या ५० सदनिका बांधण्यात येणार आहेत. १५८२५.२८ चौरस मीटर क्षेत्रफळ जागेत हे बांधकाम होईल.

चेंबूर वामनवाडी, सिंधी सोसायटी येथे २१९८.७ चौरस मीटर जागेत सध्या ३४ घरे आहेत. या ठिकाणी २०६०९.६७ चौरस मीटर जागेत ३०० चौरस फुटांची ५१६ घरे बांधण्यात येतील. या एकूण ५६६ घरांसाठी सुमारे १७१ कोटी ९५ लाख ११ हजार ७८८ रुपये खर्च करण्यात येणार आहे.

घाटकोपर चिरागनगर या ठिकाणी ८० घरे असून येथे ३०० चौरस फुटांची ९० घरे बांधण्यात येतील.

कुर्ला लायन्स गार्डन या ठिकाणी ३०० चौरस फुटांची १५८ तर ६०० चौरस फुटांची ३१ घरे बांधण्यात येतील.

भांडुपमधील आम्रपाली बििल्डग येथे ४८ घरे असून पुनर्विकासात ३०० चौरस फुटांची घरे बांधण्यात येतील.

मुलुंड गायकवाडनगर येथे ८४ सदनिकांच्या ठिकाणी पुनर्विकासात ३०० चौरस फुटांची ४०१ तर ६०० चौरस फुटांची ६६ घरे बांधण्यात येणार आहेत. यासाठी २४३ कोटी ९ लाख ३५ हजार ८१५ रुपये खर्च करण्यात येणार आहे.