मुंबई : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपप्रकरणी सध्या अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना तात्पुरता वैद्यकीय जामीन देण्यास विशेष न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. मात्र खासगी रुग्णालयात उपचार घेण्यास न्यायालयाने मलिक यांना परवानगी दिली.

मलिक यांना सुरुवातीपासून त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडे न नेल्याबद्दल न्यायालयाने या वेळी अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) फटकारले. मूत्रिपडाच्या आजारावरील उपचारांसाठी मलिक यांनी सहा आठवडय़ांचा तात्पुरता वैद्यकीय जामीन मंजूर करण्याची आणि खासगी रुग्णालयात उपचार घेण्यास परवानगी देण्याची मागणी केली होती. विशेष न्यायालयाने शुक्रवारी मलिक यांची तात्पुरता वैद्यकीय जामीन देण्यास नकार दिला. त्याच वेळी त्यांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी परवानगी दिली. शिवाय उपचारांच्या वेळी मलिक यांच्या मुलीला उपस्थित राहण्यासही न्यायालयाने परवानगी दिली.

मलिक यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आपल्यावर जेजे रुग्णालयात योग्य प्रकारे उपचार करण्यात आले नाहीत. त्यामुळे आपल्याला खासगी रुग्णालयात उपचार करण्यास परवानगी देण्याची मागणी खुद्द मलिक यांनी न्यायालयाकडे केली होती.