कोकण मंडळ सोडत

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ८९८४ घरांच्या सोडतीसाठीच्या नोंदणी, अर्जविक्री – अर्जस्वीकृतीच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार आता इच्छुकांना २९ सप्टेंबरपर्यंत नोंदणी करता येणार असून बँकेकडे अनामत रक्कमेसह ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज ऑनलाइन जमा करता येणार आहे.

 आरटीजीएस/एनईएफटीद्वारे १ ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. ही मुदतवाढ केवळ या प्रक्रियेसाठीच असून सोडत मात्र निश्चिात वेळेत अर्थात १४ ऑक्टोबरलाच आहे.

२२ ऑगस्टला कोकण मंडळाच्या ८९८४ घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली. तर २४ ऑगस्टपासून नोंदणी, अर्जविक्री, स्वीकृतीला सुरुवात झाली. बुधवारी (२२ सप्टेंबर) नोंदणीचा शेवटचा दिवस होता. रात्री ११.५९ ला नोंदणी बंद होणार होती. नोंदणी बंद होण्यास काही तास उरले असतानाच कोकण मंडळाने नोंदणीसह अर्जविक्री – स्वीकृतीला मुदतवाढ दिल्याचे जाहीर करत इच्छुकांना दिलासा दिला आहे.

या मुदतवाढीनुसार नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून आता २९ सप्टेंबरपर्यंत (रात्री ११.५९ वाजेपर्यंत) नोंदणी करता येणार आहे. तर बँकेकडे अनामत रक्कमेसह ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज ऑनलाइन जमा करता येणार आहे. आरटीजीएस/एनईएफटीद्वारे १ ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. याआधी अर्ज सादर करण्याची मुदत २३ सप्टेंबर अशी होती. तर आरटीजीएस/एनएफटीसह अर्ज सादर करण्यासाठीची मुदत २४ सप्टेंबर होती.

चांगला प्रतिसाद

२२ सप्टेंबरच्या सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत १ लाख ४० हजार ४९५ इच्छुकांनी नोंदणी केली आहे. तर १ लाख ८३ हजार ६२६ अर्ज भरले गेले असून यातील १ लाख ४२ हजार ३६ जणांनी अनामत रक्कमेसह बँकेकडे अर्ज दाखल केले  आहेत.

नोंदणी, अर्जविक्री – स्वीकृतीला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.  नोंदणी, अर्जविक्री – स्वीकृतीची प्रक्रिया सुरू असताना अनेक सण आले. या काळात अनेक जण व्यग्र होते. गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने नागरिक गावी गेले होते. त्यामुळे इच्छुकांना सोडतीत सहभागी होण्यासाठी आणखी मुदत मिळावी यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. – नितीन महाजन, मुख्य अधिकारी, कोकण मंडळ