मुंबईत ५०० चौ.फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या घरात राहणाऱ्यांच्या मालमत्ता करात वाढ न करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. महापालिकेने पाठविलेल्या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे, तर सरकारने भाडेपट्टय़ाने (लीज) दिलेल्या जमिनी मालकी हक्काने देण्याचा विचार सुरू असून केवळ ‘ब’ संवर्गातीलच जमिनींचे हस्तांतरण होऊ शकेल, असे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले. लहान क्षेत्रफळाच्या घरात राहणाऱ्या मुंबईकरांवर वाढीव मालमत्ता कराचा बोजा पडू नये, यासाठी त्यांना मालमत्ता करवाढीतून वगळण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता.
 आधीच्या सरकारच्या काळातही पाच वर्षांसाठी ही सूट देण्यात आली होती व ती आणखी पाच वर्षांसाठी देण्याचा प्रस्ताव होता. सरकारने घेतलेल्या निर्णयाचा फायदा सुमारे १६ लाख ७९ हजार सदनिकाधारकांना होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुंबई भाजप अध्यक्ष अ‍ॅड. आशीष शेलार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची मंगळवारी भेट घेतली आणि हा मुद्दा मांडला होता. त्यामुळे त्याचे श्रेय घेण्याच्या वादातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि अ‍ॅड. शेलार यांच्यात जुंपली आहे. त्यांनी एकमेकांवर टीकाटिप्पणी केली आहे.