जपानी कंपनीची जाहीर नोटीस; खाद्यपदार्थातून बाद नसले तरी उच्चारातून बंद होणार
चायनीज पदार्थाना चव आणणारा अविभाज्य घटक अजिनोमोटो त्याच्या घातकतेवर कितीही चर्चा झाली तरी  ‘अन्ना’मधून आजतागायत सारला गेला नाही. मात्र त्याचा उच्चार लवकरच संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत.  ‘मोनोसोडिअम ग्लुटामेट’च्या (एमएसजी) संदर्भात आपण ‘अजिनोमोटो’ या शब्दाचा सर्रास वापर करीत असलो, तरी खरेतर ‘अजि-नो-मोटो’ या नावाने एका जपानी कंपनीचा ट्रेडमार्क (व्यापारचिन्ह) आहे. या कंपनीचे नावच मुळी ‘अजिनोमोटो कंपनी’ असे असून यापुढे या शब्दाचा सरसकट वापर करण्यात येऊ नये, असे कंपनीने जाहीर नोटिशीद्वारे बजावले आहे.
आपली कंपनी खाद्यपदार्थात अधिकची चव आणण्याकरिता वापरले जाणारे ‘मोनोसोडिअम ग्लुटामेट’ (एमएसजी- एक प्रकारचे अमिनो अॅसिड) तयार करते. आणि हे एमएसजी ‘अजि-नो-मोटो’ या ब्रँडखाली गेली कित्येक वर्षे विकले जात आहे, असे या कंपनीचे म्हणणे आहे. ‘याचाच अर्थ एखाद्या पदार्थात एमएसजी आहे, याचा अर्थ ते ‘अजि-नो-मोटो’ असेलच असे नाही. म्हणून आमच्या ‘अजि-नो-मोटो’ या उत्पादनाचा ‘एमएसजी’चा संदर्भ देताना किंवा त्याचे वर्णन करताना जो ‘सामान्यनाम’ (जेनेरिक नेम) म्हणून वापर केला जातो तो थांबविण्यात यावा,’ असे कंपनीने स्पष्ट केले आहे. तसेच, या पुढे ‘अजिनोमोटो’ या शब्दाचा विपर्यास करणारा वापर केल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर दिवाणी दावा दाखल केला जाईल, असा इशारा दिला आहे.

अर्थात बंधन कालमर्यादेचे
काही ट्रेडमार्कच्या सततच्या आणि सहज वापरामुळे ती विशेषनामे राहत नाहीत. झेरॉक्स, कॅडबरी, बिसलेरी अशा काही ट्रेडमार्कच्या बाबतीत हे झाले आहे. एखाद्याला आपल्या ट्रेडमार्कचे सामान्यनाम म्हणून वापर होत असल्याचे जाणवल्यास त्यांना संबंधितांवर कायदेशीर दावा दाखल करता येतो. परंतु, त्यासाठी विशिष्ट कालमर्यादेचे बंधन असते.
– प्रा. डॉ. मृदुला बेळे,
बौद्धिक संपदा कायदा ,व पेटंट सल्लागार

खाद्यपदार्थ निर्मितीच्या क्षेत्रात असलेली ही कंपनी १०० वर्षे जुनी असून भारतात तिचा ट्रेडमार्क १९६०सालीच नोंदविण्यात आला होता. भारतातही ती ‘अजिनोमोटो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या नावाने कार्यरत आहे. १९०१ साली एमएसजीच्या विक्रीला सुरुवात केली. जगातील १०० देशांमध्ये या कंपनीच्या उत्पादनांची विक्री होते.