दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध ‘ऱ्हिदम हाऊस’ इतिहासजमा!
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत असो अथवा हिंदी चित्रपट, भक्ती, गझल, भाव संगीत असो.. अगदी पाश्चिमात्यांच्या जॅझ, रॉक, पॉप अशा विविध प्रकारच्या संगीताच्या शोधात असणाऱ्या रसिकांना ज्यांनी रिकाम्या हाती कधीच परत पाठविले नाही ते दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध ‘ऱ्हिदम हाऊस’ आता रिते-रिते झाले आहे. तंत्रज्ञानात झालेला बदल, बदलती माध्यमे, पायरसी यामुळे एलपी, सीडी, डीव्हीडीवरून संगीत आता मोबाइल, आयपॉडवर आले आहे. याची झळ ऱ्हिदम हाऊसलाही बसू लागल्याने ते आता शेवटच्या घटका मोजते आहे. जगभरातल्या संगीताचा ऐवज असणारे ऱ्हिदम हाऊस येत्या २८ फेब्रुवारीपासून बंद होणार, यावर आता त्याच्या चालकांनी शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे ऱ्हिदम हाऊसकडे असलेला सीडी, डीव्हीडींचा खजिना आता सवलतीच्या दरात विकला जात असून अनेकांनी त्यासाठी ऱ्हिदम हाऊसकडे धाव घेतली आहे. ऱ्हिदम हाऊसची शेवटची आठवण आपल्या संग्रहात जमा करण्यासाठी दर्दी रसिक ऱ्हिदम हाऊसला भेट देत आहेत. असलेल्या साठय़ापैकी आता फक्त दहा टक्के साठाच शिल्लक राहिला असून संगीताचा हा खजिना रिता झाला आहे. एकेकाळी संगीतविश्वाचे सोनेरी युग अनुभवलेल्या ऱ्हिदम हाऊसचे हे रूप पाहणे फारच क्लेशदायक आहे, असे येथे गेली १८ वर्षे काम करत असलेल्या अतिक खान यांनी सांगितले. ऱ्हिदम हाऊसमध्ये सुमारे ४५ कर्मचारी काम करत होते, परंतु सध्या तिथे ३० कर्मचारी कार्यरत असून ऱ्हिदम हाऊस बंद झाल्यावर त्यांच्यासमोर उपजीविकेचा प्रश्न तर उभा राहणार आहे. पण येथे काम करत असताना त्यांनी कमावलेल्या संगीताच्या ज्ञानाचे आता काय करायचे हाही प्रश्नच आहे. तसेच देशी-विदेशी संगीताच्या वातावरणात वावरण्याच्या संधीलाही आता मुकावे लागणार आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
दक्षिण मुंबईतील काळा घोडा व जहांगीर आर्ट गॅलरी यांच्या मधे असणारे रिदम हाऊस गेली ६८ वर्षे मुंबईच्या सांस्कृतिक विश्वाचा अविभाज्य घटक होते.
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत, कर्नाटकी शास्त्रीय संगीत ते हिंदी चित्रपटातील गाणी, रॉक संगीतापासून ते भक्तिसंगीत, विविध देशांतील संगीतापासून ते भारतीय-विदेशी सिनेमे असा सांस्कृतिक खजिना असणारे हे संगीताचे मंदिर आता कायमचे बंद होणार आहे.
जगभरातील अनेकांच्या आयुष्यातील स्वर-सुरांनी व्यापलेल्या आठवणी या वास्तूशी जोडलेल्या आहेत. परंतु, आता या साऱ्या गोष्टी स्मृतिशेष बनून राहणार आहेत.
तंत्रज्ञानामुळे झालेला बदल, बदलती माध्यमे, पायरसी इत्यादी बाबींमुळे ग्राहकांची संख्या गेल्या काही वर्षांपासून कमी होत गेली आणि शेवटी रिदम हाऊस बंद करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
गायक, संगीतकार, चित्रपट क्षेत्रातील तारे-तारका यांच्यापासून ते मुंबईतील संगीतरसिक यांच्याबरोबरच देशी विदेशी पर्यटकही रिदम हाऊसला भेट देऊन जायचे.
आतापर्यंत अनेक मान्यवरांनी येथून आपली संगीतास्वादाची तहान भागवली आहे. रिदम हाऊस बंद होण्याच्या बातमीपासून अनेक संगीतप्रेमींनी येथे भेट देऊन आपल्या आठवणींना उजाळा दिला. काहींनी तर पाणावलेल्या डोळ्यांनी रिदम हाऊसचा निरोप घेतला, अशी माहिती इथे गेली २४ वर्षे काम करत असलेल्या महादू परमार यांनी सांगितली.

ऱ्हिदम हाऊस कलाकृतींमध्येही
अनेकांच्या जीवनातील सांस्कृतिक अवकाश व्यापणाऱ्या रिदम हाऊसचा उल्लेख अनेक लेख, कविता, साहित्यकृती, चित्रपटांमध्येही आला आहे. ‘दिल तो पागल है’सारख्या चित्रपटांपासून ते एस. एल. भैरप्पांच्या ‘मंद्र’ कादंबरीमध्येही रिदम हाऊसचा उल्लेख आला आहे. स्वत:चे ब्रॅंन्डिंग करण्यासाठी निरनिराळ्या कल्पना लढवण्याच्या आजच्या युगात रिदम हाऊसचा हा उल्लेख विविध कलाकृतींमधून येणे, यावरूनच रिदम हाऊसचे सांस्कृतिक अवकाशातील स्थान किती खोल व्यापलेले होते याचा अंदाज येईल.