निविदा खोळंबल्याने काम सुरू होण्यास २०२३ उजाडण्याची शक्यता

मुंबई : मुंबईकरांना मेट्रोबरोबरच रोपवेनेही प्रवास करता यावा यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मेट्रो २ अ (दहिसर ते डी ए नगर) प्रकल्प रोपवेने जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महावीर नगर मेट्रो स्थानक ते गोराईदरम्यान रोपवे प्रकल्प राबविण्यात येणार आहे. मात्र निविदा प्रक्रिया खोळंबल्याने रोपवेमधून प्रवास करण्याचा आनंद लुटण्यासाठी मुंबईकरांना २०२५ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान, सादर झालेल्या निविदांना अद्याप अंतिम रूप देण्यासाठी आणखी दोन-अडीच महिने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कामास जानेवारी २०२३ मध्ये सुरुवात होऊ शकेल आणि प्रकल्प पूर्ततेस २०२५ उजाडण्याची शक्यता आहे.

मेट्रो २ अचे काम वेगात सुरू असून हा मार्ग येत्या वर्षांत वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र त्याच वेळी मेट्रो २ अला जोडणाऱ्या रोपवेची निविदाही अद्याप अंतिम झालेली नाही. मेट्रो २ अमुळे पश्चिम उपनगरातील प्रवास वेगवान होणार असून मेट्रो २ अचा वापर अधिकाधिक व्हावा यासाठी एमएमआरडीएने मेट्रो प्रकल्प रोप वेने जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महावीर नगर मेट्रो स्थानक ते गोराई आणि मालाड ते मार्वे असा अंदाजे १० किमीचा रोप वे प्रकल्प उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात महावीर नगर मेट्रो स्थानक ते गोराई असा ७.२ किमी लांबीचा रोप वे प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे संरेखन, गुंतवणूक आणि बांधकामासाठी एमएमआरडीएने गेल्या वर्षी निविदा मागविल्या होत्या. मात्र या निविदेला प्रतिसादच मिळाला नाही. त्यामुळे निविदेला दोनदा मुदतवाढ देण्याची वेळ एमएमआरडीएवर आली आणि प्रकल्प लांबणीवर पडत गेला. पण अखेर निविदेला दोन कापन्यांनी प्रतिसाद दिला. कंपन्यांनी आपापल्या निविदा सादर करून बराच कालावधी लोटला. मात्र याबाबतची प्रक्रिया पूर्ण होऊन सादर निविदांना अंतिम रूप देण्यात आलेले नाही. त्यासाठी आणखी दोन ते अडीच महिने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे निविदा अंतिम झाल्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करुन रोप वेच्या प्रत्यक्षा कामाला जानेवारी २०२३ मध्ये सुरुवात होऊ शकेल. तर काम पूर्ण होऊन रोपवे वाहतूक सेवेत दाखल करण्यासाठी २०२५ उजाडेल, असे एमएमआरडीएतील अधिकाऱ्याने सांगितले.

पहिल्या टप्प्याचा खर्च ५६७ कोटी

  • महावीर नगर मेट्रो स्थानक ते गोराई रोपवे असा प्रकल्पाचा पहिला टप्पा ७.२ किमीचा मार्ग ५६७ कोटी रुपये खर्च अपेक्षित
  • निविदा प्रक्रिया सुरू जानेवारी २०२३ मध्ये काम सुरू होण्याची शक्यता २०२५ मध्ये काम पूर्ण होण्याची शक्यता मेट्रो २ अ रोपवेशी जोडला जाणार. दीड तासाचा प्रवास केवळ ३६ मिनिटांत होणार पूर्ण.

महावीर नगर मेट्रो स्थानक ते गोराई रोपवेसाठी दोन निविदा सादर झाल्या आहेत. निविदेची छाननी सुरू असून दोन-अडीच महिन्यांत निविदा अंतिम होईल. तर काम सुरू होण्यास आणखी काही वेळ लागणार आहे.

एस. व्ही. आर. श्रीनिवास, महानगर आयुक्त