Aryan Khan Case: क्रांती रेडकर म्हणते, “समीर यांची बदली झाली तर…”

आज मुंबईमध्ये समीर वानखेडेंबरोबरच आर्यन खान प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावी व प्रभाकर साईलचीही चौकशी केली जाणार

Kranti Redkar Sameer Wankhede
समीर वानखेडे दिल्लीमध्ये असताना क्रांतीने व्यक्त केलं मत

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्ग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर करण्यात आलेल्या लाचखोरीच्या आरोपांमुळे वादात सापडलेले अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी मंगळवारी दिल्लीतील ‘एनसीबी’च्या मुख्यालयात उपमहासंचालकांसमोर आपली बाजू मांडली. मात्र, वानखेडे यांच्यावर झालेल्या कथित लाचखोरीच्या आरोपाची चौकशी करण्यात येणार असून, त्यासाठी चार वरिष्ठ अधिकारी आज मुंबईत. या चौकशीमुळे वानखेडे यांच्या बदलीची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र असं असतानाच समीर यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने या संभाव्य बदलीसंदर्भात आपलं मत व्यक्त केलं आहे.

समीर वानखेडेंना हटवल्याचा फायदा कोणाला होणार
क्रांती रेडकरने काल मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन आम्हाला धमकावलं जात असल्याचा आरोप केलाय. तसेच सध्या समीर वानखेडेंवर केले जाणार आरोप हे चुकीचे असून खरं काय आहे ते आम्ही सरकारी कागदपत्रांसहीत दाखवलं आहे असंही क्रांती म्हणालीय. समीर तिथून हटले तर कोणाचा फायदा होणार हे शोधलं पाहिजे. ज्या पद्धीने समीर यांच्याबद्दलची माहिती काढली जातेय त्यासाठी पैसे लागतात. हे काही ड्रग्ज पेडलर्सचं वगैरे काम नाहीय. यासाठी प्रायव्हेट डीटेक्टीव्ह वगैरे लागतात. एवढं पैसे टाकतायत तर काहीतरी हेतू असणार, अशी शंकाही क्रांतीने बोलून दाखवली. तर समीर यांची बहीण जास्मिन वानखेडे यांनी या प्रकरणामध्ये पेड लॉबी आहे असं आम्हाला कळाल्याचं प्रसार माध्यमांना सांगितलं.

समीर यांची बदली झाली तर…
याच मंगळवारी झालेल्या या पत्रकार परिषदेनंतर न्यूज १८ शी चर्चा करताना क्रांती रेडकरने समीर यांच्या संभाव्य बदलीसंदर्भात भाष्य केलंय. “थोड्यावेळाने समीर वानखेडेंची बदली झाल्याची बातमी पण येऊ शकते त्यावर काय प्रतिक्रिया असेल?”, असा प्रश्न क्रांती यांना विचारण्यात आला. “अगदीच हा अजेंडा आहे की त्यांना या जागेवरुन काढून टाकायचं आहे. कारण की सच्चा माणूस आहे. कोणाच्या चुकीच्या ऑर्डर ऐकत नाही, पैसे खात नाही, इमानदार आहे. तर अशी माणसं टीकत नाहीत. खऱ्याचा जमाना नाहीय. त्यामुळे त्यांची बदली झाली तर मला आश्चर्य वाटणार नाही,” असं क्रांती म्हणाली.

सोशल मीडियावरुन धमक्या…
मंगळवारच्या पत्रकार परिषदेमध्ये सोशल नेटवर्किंगवर आम्हाला ठरवून टार्गेट केलं जात असल्याचा आरोप क्रांती आणि जास्मिन यांनी केला. रोज आम्हाला शिव्या दिल्या जातात, वाईट बोललं जातं असल्याचे प्रकार आमच्यासोबत सोशल नेटवर्किंगवर सुरु आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हे ओपनली होत आहे आणि आम्ही काहीच करु शकत नाही, असं क्रांती म्हणाली.

आज एनसीबीचं पथक मुंबईत…
समीर वानखेडे यांच्या विभागीय चौकशीसाठी उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग आणि त्यांचे विभागीय संचालक दर्जाचे तीन सहकारी आज दिल्लीहून मुंबईला येणार आहेत. हे अधिकारी या प्रकरणाचे साक्षीदार किरण गोसावी व प्रभाकर साईल या दोघांचीही चौकशी करणार आहेत. प्रभाकर साईल जो या प्रकरणामध्ये छापा टाकाताना एनसीबी सोबत असणाऱ्या किरण गोसावीच्या गाडीचा चालक होता, त्याने वानखेडेंवर खंडणी मागितल्याचा धक्कादायक आरोप केलाय. साईलने केलेल्या आरोपानुसार हे प्रकरण मिटवण्यासाठी २५ कोटींची खंडणी मागण्यात आली होती. आर्यनला मुक्त करण्यासाठी एनसीबी अधिकाऱ्यांनी ही खंडी मागितली होती. यामध्ये साईलने वानखेडेंचंही नाव घेतलं होतं. मात्र वानखेडेंनी हे आरोप फेटाळून लावलेत.

दिल्ली दौरा वेगळ्या करणासाठी…
दिल्लीमध्ये मंगळवारी वानखेडेंनी एनसीबीच्या महासंचाकलांची भेट घेतली. काल रात्रीच वानखेडे मुंबईत परतल्याचं सांगितलं जात आहे. आपल्याला कोणतेही समन्स देण्यात आलेले नाही, असं वानखेडेंनी यापूर्वीच स्पष्ट केलं असून आपण वेगळ्या कारणानिमित्त दिल्लीत आलो आहोत, असं ते म्हणाले होते. “दिल्लीत येण्यामागील कारण वेगळं आहे. माझ्यावर लावण्यात आलेले आरोप बिनबुडाचे आहेत. सध्या तपास सुरु असल्याने या बद्दल मी काहीही बोलू इच्छित नाही, मी सर्व गोष्टींना योग्य वेळी उत्तर देईन,” असं वानखेडे म्हणाले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sameer wankhede wife kranti redkar on transfer of her husband from aryan khan drugs case scsg

ताज्या बातम्या