एनआरआय आणि खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खाडीत सुरू असलेल्या अवैध रेती उपसाविरोधात पोलिसांनी कारवाई करीत १६ जणांना अटक केली.
या कारवाईत पोलिसांनी तब्बल ३३ लाखांचा माल हस्तगत केला आहे.  ही कारवाई करताना पोलिसांनी मोठी गुप्तता पाळली होती. याची खबर पनवेल तहसील कार्यालयालाही देण्यात आली नव्हती. बेलापूर, खारघर खाडीत अवैधरीत्या रेतीचा उपसा सुरू असलेल्या ठिकाणी संध्याकाळी पोलिसांच्या पथकाने छापे टाकले. यात ५ बोटी, रेती उपसासाठी आवश्यक असलेले ५ सक्शन पंप आणि १७ ब्रास वाळू असा ३२ लाख ६४ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. बेलापूर पोलीस ठाण्यात अक्षयकुमार चव्हाण, राजकुमार चौधरी या दोघांविरोधात, खारघर पोलीस ठाण्यामध्ये देवकी यादव, राजेशकुमार चौरसिया, प्रेमकुमार महोटो, नंदकुमार यादव, शीतल महोटो, टुनटुन यादव, दिनेश शहा व बेलापूर पोलीस ठाण्यात ललन महोटो, राजू प्रसाद, अशोकलाल यादव, कुवर किसको आणि विजय साब अशा १६ कामगारांना अटक करण्यात आली आहे.  सर्व कामगार रेती बंदर बाजूला असलेल्या झोपडपट्टीतील रहिवासी आहेत.
एनआरआय पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद परुळेकर आणि साहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बेंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.