१७२ यंत्रे बसवण्याचा निर्णय

मुंबई महानगरपालिकेने शहरातील सार्वजनिक शौचालयांमध्ये महिलांसाठी ‘सॅनिटरी नॅपकीन’ वेंडींग यंत्रे बसवण्यात आल्यानंतर पालिका शाळांमध्येही अशी १७२ यंत्रे बसवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या यंत्रांसोबत ‘सॅनिटरी नॅपकीन’ची विल्हेवाट लावणारी यंत्रे देखील बसवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर पालिका शाळांमधील विद्यार्थिनींना ‘सॅनिटरी नॅपकीन’ही उपलब्ध करून दिले जाणार आहे.

महापालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलींच्या आरोग्यासाठी ‘सॅनिटरी नॅपकीन’ उपलब्ध व्हावे यासाठी वेंडींग यंत्रे व त्यांची विल्हेवाट लावण्यासाठीची ‘बर्निग यंत्र’ बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार महापालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये महिलांच्या प्रसाधनगृहांमध्ये हे यंत्र बसवण्यात येत असून त्यासाठी १७२ सॅनिटरी नॅपकीन वेंडींग आणि बìनग यंत्राची खरेदी करण्यात येणार आहे.

या खरेदीच्या प्रस्तावाला बुधवारी स्थायी समितीच्या बठकीत मंजुरी देण्यात आली असून हा प्रस्ताव मंजूर झाल्यामुळे लवकरच ही यंत्रणा सुरू केली जाणार आहे. सुमारे १६ लाख १० हजार २०० ‘सॅनिटरी नॅपकीन’चा पुरवठा शाळांमधून केला जाणार आहे. यासाठी १ कोटी ५३ लाख रुपये खर्च होणार आहे.

आरोग्याच्यादृष्टीने उपाययोजना

अलिकडे करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार भारतातील ज्या स्त्रियांना मासिक पाळी येते, त्यापकी फक्त १२ टक्के स्त्रिया सॅनिटरी नॅपकीनचा वापर करतात. या स्त्रियांना सॅनिटरी नॅपकीनची योग्य विल्हेवाट कशी लावावी याची माहित नसते. वापरलेले नॅपकीन उघडय़ावर फेकल्यामुळे यातून १ लाख जीवाणू अवघ्या ४ सेकंदात तयार होत असतात, असे विविध अभ्यासातून पुढे आले आहे. नॅपकिन जाळणाऱ्या यंत्रामुळे जीवाणूंवर नियंत्रण आणणे शक्य होणार आहे.