अटक वॉरंटचा दट्टय़ा बसताच संजय दत्त न्यायालयात हजर

निर्माता शकील नुरानी याला धमकावल्याप्रकरणी दाखल झालेल्या खटल्यात वारंवार समन्स बजावूनही सुनावणीला हजर न राहणाऱ्या संजय दत्तविरोधात अंधेरी न्यायालयाने सोमवारी अखेर अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले.

निर्माता शकील नुरानी याला धमकावल्याप्रकरणी दाखल झालेल्या खटल्यात वारंवार समन्स बजावूनही सुनावणीला हजर न राहणाऱ्या संजय दत्तविरोधात अंधेरी न्यायालयाने सोमवारी अखेर अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले. मात्र त्यानंतर संजयने तडकाफडकी वकिलांसोबत न्यायालय गाठले आणि जामीन देण्याची विनंती केली. न्यायालयानेही मग त्याला १० हजार रुपयांचा जामीन मंजूर केला.
नुरानी यांच्या ‘जान की बाजी’ या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण होण्याआधीच संजय त्यातून बाहेर पडला. २००२ मध्ये घडलेल्या या प्रकारानंतर संजयने चित्रिकरण पूर्ण करण्याबरोबरच नुरानी यांनी दिलेले ५० लाख रुपये परत देण्यासही नकार दिला. तेव्हापासून या दोघांमध्ये ही लढाई सुरू आहे. न्यायालयाने नुरानीच्या तक्रारीची दखल घेत संजयला न्यायालयात हजर राहून त्याच्यावरील आरोपांबाबत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत.
नूरानीने आधी ‘इंडियन मोशन पिक्चर प्रोडय़ुसर असोसिएशन’कडे धाव घेतली होती. त्यावेळी असोसिएशनने संजयने नुरानीला दोन कोटी रुपये देण्याचे आदेश दिले होते. परंतु संजयने त्यावेळी पैसे न दिल्याने अखेर नुरानीने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या याचिकेची दखल घेत संजयच्या नावे असलेल्या दोन मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते. परंतु त्यानंतर संजयने आपल्याला अंडरवर्ल्डच्या माध्यमातून धमकावण्यास सुरुवात केल्याचा आरोप करीत नुरानीने संजयविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला. नूरानीच्या तक्रारीची दखल घेत महानगरदंडाधिकाऱ्यांनी त्याला समन्स बजावत हजर राहण्याचे आदेश दिले. मात्र वारंवार समन्स बजावून संजय हजर न झाल्याने सोमवारी सकाळी अखेर न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले. १९९३ च्या बॉम्बस्फोट खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे आधीच अडचणीत आलेल्या संजयने हे अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले जाताच तातडीने वकील रिझवान र्मचट यांच्यासह अंधेरी न्यायालय गाठले. तसेच न्यायालयासमोर हजर होत जामीन देण्याची विनंती केली. या प्रकरणाची सुनावणी आता ३ मे रोजी होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sanjay dutt present in court after arrest warrent

ताज्या बातम्या