भारतातील मोठी बाजारपेठ आपल्या हातून जाऊ नये या दृष्टीने जागतिक कंपन्यांनी सुरू केलेल्या वाटचालीत मायक्रोसॉफ्टही सहभागी झाले आहे. ‘या भूतलावरील प्रत्येक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्यक्ती आणि संस्थेत संगणक पोहोचवणे’ या कंपनीच्या ध्येय वाक्यात आता कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी भारताचा समावेश करण्यात आल्याचे नमूद केले. याचबरोबर भविष्यात भारतातील प्रत्येक नागरिक, प्रत्येक व्यवसाय आणि सरकारला तंत्रज्ञानदृष्टय़ा सक्षम करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट कटिबद्ध असेल असेही स्पष्ट केले.

मी जितक्या वेळा भारतात येतो तेव्हा प्रत्येक वेळी मला येथील उद्योजकांमधील ऊर्जा खुणावत असते. यामुळे भारतातील नवउद्योजकांना तसेच ई-कॉमर्स संकेतस्थळांना प्रोत्साहन देण्यासाठी मायक्रोसॉफ्ट इच्छुक असून हे उद्योग जागतिक स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी कंपनी प्रयत्नशील असेल, असेही नाडेला यांनी स्पष्ट केले. भारतातील उद्योग आणि सरकारी यंत्रणांना मायक्रोसॉफ्टसोबत काम करण्याच्या संधींबाबत ओळख करून देण्याच्या उद्देशाने कंपनीने मुंबईत ‘फ्युचर अनलिश्ड’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विविध संधींबाबत नाडेला यांनी सादरीकरण केले. यामध्ये त्यांनी स्मार्ट शहरांच्या निर्मितीला प्रोत्साहन म्हणून ‘मायक्रोसॉफ्ट स्टार्टअप’ हा उपक्रम हाती घेण्यात येणार असून त्यात इच्छुकांना ८० लाख रुपयांचे कर्जही उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या कंपनीने स्नॅपडील, जस्ट डायल आणि पेटीएम या ई-कॉमर्स कंपन्यांशी सहकार्य केल्याची माहितीही त्यांनी दिली.

या कार्यक्रमाला उद्योगपती आनंद महिंद्रा, अ‍ॅक्सिस बँकेच्या प्रमुख शिखा शर्मा, टाटा स्टारबक्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अवनी दावडा आदी उपस्थित होते.

भविष्य कम्प्युटिंगचे
भविष्यात कम्प्युटिंग तंत्रज्ञानाचा गाभा ठरणार असून यासाठी मोबाइल आणि क्लाऊड तंत्रज्ञानाला जास्तीत जास्त प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. क्लाऊडमुळे कुणालाही कुठूनही काम करता येणे शक्य होणार आहे. तसेच मोबाइलमधील विविध अ‍ॅप्सच्या मदतीने आपल्या कामाचे योग्य नियोजन करणेही सोपे होणार असल्याचे नाडेला यांनी स्वानुभवावरून स्पष्ट करून दाखविले. तंत्रज्ञानाच्या मदतीनेच शहरी समस्या सोडविणे शक्य होणार असल्याचेही नाडेला यांनी स्पष्ट केले. यासाठी सरकारी यंत्रणांबरोबर आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावू शकणार आहे.

२०१६पर्यंत ५० गावं स्मार्ट
२०१६पर्यंत राज्यातील ५० गावे स्मार्ट करण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात स्पष्ट केले. या वेळी मायक्रोसॉफ्ट इंडियाचे अध्यक्ष भास्कर प्रमाणिक यांनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली.

जानेवारीत ‘मायक्रोसॉफ्ट सरफेस’ भारतात
लॅपटॉपला पर्याय ठरणारा मायक्रोसॉफ्टचे सरफेस प्रो ४ हे उपकरण जानेवारीत भारतीय बाजारात दाखल होणार असल्याचे नाडेला यांनी या वेळी स्पष्ट केले. या सरफेस प्रो ४सोबत एक पेन देण्यात येणार असून याचा वापर करून आपण उपकरणाच्या स्क्रीनवर लिखाण करू शकतो. हे उपकरण टॅब म्हणूनही आपण वापरू शकतो, इतकेच नाही तर याला की-बोर्ड जोडून ते लॅपटॉपप्रमाणेही वापरू शकतो.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satya nadella pitches microsoft in india
First published on: 06-11-2015 at 04:25 IST