बारावीत चांगले गुण मिळाले म्हणून आठ हजारांची शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांने या पैशांचा वापर दुष्कृत्यासाठी केल्याची घटना उघडकीस आली आहे. सरवणकुमार जैस्वार (२२) असे या विद्यार्थ्यांचे नाव असून त्याने ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. या दुष्कृत्यात त्याला साथ देणाऱ्या त्याच्या मित्रांनाही अटक करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील रहिवासी असलेल्या सरवणकुमारचे त्याच्या गावातील गीता (नाव बदलले आहे) या ११वर्षीय मुलीवर प्रेम होते. सरवणला शिष्यवृत्तीचे आठ हजार रुपये मिळायचे तसेच तो अर्धवेळ नोकरी करून पाच हजार रुपये कमवायचा. गीताचे आई-वडील वारल्यानंतर तिच्या मावशीने तिला सायन, मुंबई येथे आणले. सरवणकुमारही तिच्यापाठोपाठ मुंबईत दाखल झाला. त्याने गीताला फूस लावून तिला पळवून नेले. शिष्यवृत्तीचे पैसे व आपकमाई यातून जमा झालेल्या पैशाच्या जोरावर तो गीताला दोन महिने हरयाणा, हिमाचल प्रदेश आदी ठिकाणी फिरवत राहिला. गीताच्या मावशीने याप्रकरणी पोलिसांत तक्रार केली. वडाळा ट्रक टर्मिनस पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास गरूड, पोलीस निरीक्षक कदम आणि पोलीस उपनिरीक्षक साळुंखे यांनी या प्रकरणाचा तपास करून मुलीची सुटका केली आणि आरोपी सरवणकुमारला अटक केली. आरोपीने हरयाणात जबरदस्तीने गीताशी लग्न केले होते. या प्रकरणी सरवणला आश्रय देणारा राजन जैस्वार तसेच भटजी बनून लग्न लावून देणाऱ्या सुरिंदर सिंग यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. मुलगी अल्पयीन असल्याचे माहीत असूनही या गुन्ह्यात साथ दिल्याने या सर्वावर बलात्कार, अपहरण आणि पोक्सो कायद्याअंतर्गत अटक करण्यात आल्याचे सुहास गरूड यांनी सांगितले.