मार्च महिन्यात झालेल्या चौथी आणि सातवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल या वर्षीही लांबण्याची शक्यता आहे. तात्पुरता निकाल जाहीर करून त्या संबंधातील आक्षेप व चुकांची दुरुस्ती केल्यानंतरच अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार असल्याने निकालाची तारीखही निश्चित करण्यात आलेली नाही. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल यंदाही जुलैच्या शेवटच्या आठवडय़ापर्यंत लांबण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकालच जाहीर केला जात असे. परंतु, नंतर निकाल जाहीर केल्यानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रतींची मागणी करून त्यातील आक्षेप दूर करणे या प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. त्यामुळे अंतिम निकालात बदल होतात. म्हणून ‘महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे’ने गेल्या वर्षी आधी तात्पुरता निकाल जाहीर करून त्यातील आक्षेप व चुका दूर केल्यानंतरच अंतिम निकाल जाहीर करण्याची पद्धती अनुसरली. त्यामुळे, निकालाला विलंब झाला होता.
यंदाही याच टप्प्याटप्प्याने निकालात सुधारणा करण्यात येणार आहे. विविध टप्पे असल्याने निकालाला गेल्या वर्षीप्रमाणेच काहीसा विलंब होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.