दीड लाख कामगार बेकार होण्याचा धोका

राज्यात आगामी २०१६-१७ या शैक्षणिक वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांना केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत पोषण आहाराचा पुरवठा केला जाणार आहे, परिणामी गेल्या दहा-बारा वर्षांपून आहार पुरवठा करणाऱ्या महिला बचत गट व अन्य संस्थांमधील सुमारे दीड लाख कामगार बेकार होण्याचा धोका आहे.

मंत्रालयात बुधवारी या संदर्भत  शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत बैठक झाली.  त्यावेळी ही नवी सेंट्रल किचन प्रणाली अंमलात आणू नये, अशी मागणी सिटू या कामगार संघटनेशी सलग्न समन्वय समितीने केली. त्यावर कामगार बेकार होणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन शिक्षण मंत्र्यांनी दिल्याची माहिती सिटूचे सरचिटणीस डॉ. डी. एल. कराड यांनी दिली. राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात येतो. प्रत्येक शाळेतच अन्न शिजवून विद्यार्थ्यांना दिले जाते. ही कामे महिला बचत गट तसेच ग्रामपंचायतींनी नेमलेल्या कामकारांकडून करून घेतली जातात. त्यामुळे मुलांना ताजे व गुणवतायुक्त अन्न मिळते. या योजनेंतर्गत महिला बचत गटातील तसेच ग्रापंचायतींनी नियुक्त केलेल्या कामगारांची संख्या १ लाख ५६ हजार आहे. आता ही पद्धत मोडीत काढून केंद्रीय उपहारगृह प्रणालीमार्फत पोषण आहार पुरवठा करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. या संदर्भात प्राथमिक शिक्षण संचालकांनी २१ मार्च रोजी राज्यातील सर्व शिक्षण अधिकारी व प्रशासन अधिकाऱ्यांना परिपत्रक पाठवून २०१६-१७ पासून नवीन प्रणालीमार्फत पोषण आहार पुरवठा करण्यात येणार असल्याचे कळविले आहे.