शालेय शिक्षण विभागाकडून अद्याप शाळांना सूचनाच नाही

मुंबई : करोनाचा प्रादुर्भाव आणि त्याचे परिणाम याबाबत गेले संपूर्ण वर्ष बेसावध राहिलेला शालेय शिक्षण विभाग अजूनही सावध झाल्याचे दिसत नाही. परीक्षा रद्द करावी लागल्यास वर्षभर मूल्यमापन केलेले असावे यासाठी विभागाने केलेले नियोजन अद्याप कागदावरच असून पहिली घटकचाचणी घेण्याची वेळ टळून गेली तरी विभागाने शाळांना काहीही सूचना दिलेली नाही.

यंदा दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत निर्माण झालेल्या गोंधळाच्या पाश्र्वाभूमीवर नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे विविध परीक्षांच्या माध्यमातून वर्षभर मूल्यमापन करण्याची योजना शिक्षण विभागाने आखली. दोन घटक चाचण्या आणि सहामाही परीक्षा घेऊन अंतिम परीक्षा रद्द करण्याची वेळ आल्यास या परीक्षांच्या आधारे मूल्यमापन करण्यात यावे.

विद्यार्थ्यांच्या परीक्षा कधी घ्याव्यात, कशा घ्याव्यात, किती गुणांच्या असाव्यात याबाबतची नियमावली शिक्षण विभाग निश्चित करणार होता. शाळांनीच या परीक्षा घेऊन विभागाने दिलेल्या कालावधीत, तयार करण्यात येणाऱ्या प्रणालीवर गुण नोंदवायचे. वर्षांअखेरीस गुण नोंदवण्याऐवजी प्रत्येक परीक्षेनंतर ठरावीक कालावधीत शाळांनी गुण नोंदवावे, अशी योजना आखण्यात आली आहे. मात्र अद्यापही याबाबत अंतिम निर्णय घेऊन शिक्षण विभागाने शाळांना काहीच सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे शाळा अद्यापही मूल्यमापनाबाबत संभ्रमात आहेत.

पहिल्या चाचणीची वेळ सरली

वर्षभराच्या शैक्षिणक वेळापत्रकानुसार साधारण गणेशोत्सवापूर्वि पहिली घटक चाचणी घेण्यात येते तर दिवाळीपूर्वी सहामाही होते. त्यानुसार पहिल्या घटक चाचणीची वेळ सरली आहे आणि सहामाही परीक्षा तोंडावर आली आहे. मात्र, अद्यापही शाळांना शिक्षण विभागाने काहीही सूचना दिलेली नाही. काही शाळांनी त्यांच्या पद्धतीने चाचणीही घेतली आहे. मात्र चाचणीच्या पद्धतीत समानता राहिलेली नाही.

वर्षभर मूल्यमापन किंवा परीक्षा घेतल्यास काय अशा दोन्ही स्वरूपात नियोजन केले आहे. त्याबाबत समन्वय समितीची बैठक घेऊन लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येईल.

      – विकास गरड, उपसंचालक       महाराष्ट राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद