बंगालच्या उपसागरातून पुढे आलेल्या मोसमी वाऱ्यांमुळे पूर्व किनारपट्टीवर जोरदार पाऊस सुरू झाला असून आंध्र प्रदेश आणि प. बंगालच्या बहुतांश भागात मोसमी पाऊस आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय ओरिसा, झारखंड व बिहारच्या काही भागांतही मोसमी पावसाने धडक मारली आहे. राज्यातही कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाच्या सरी येत असून पावसाचा प्रभाव रविवारी वाढेल. राज्याच्या बहुतांश भागांत येत्या दोन दिवसांतमोसमी पाऊस पोहोचेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

साधारण १० जूनला येणारा मोसमी पाऊस यावेळी आठवडय़ाहून अधिक विलंबाने दाखल होत आहे.   अरबी समुद्रावरील मान्सूनचा प्रभाव कमी असला तरी बंगालच्या उपसागरावरून आलेल्या मान्सूनच्या दुसऱ्या शाखेने ही कसर भरून काढली आहे. हवामानाच्या अंदाजानुसार शनिवारी व रविवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग व विदर्भात मुसळधार पाऊस अपेक्षित आहे.