scorecardresearch

मोसमी वारे परतीकडे

गुरुवारी व शुक्रवारी कोकण किनारपट्टीवरील काही ठिकाणी पावसाच्या मुसळधार सरी येण्याची शक्यता आहे.

मोसमी वारे परतीकडे
   (संग्रहित छायाचित्र)

कोकण किनारपट्टीवर उद्या पावसाची शक्यता

गेल्या महिन्याभरात पावसाने राज्याला दिलासा दिला असला तरी आता मोसमी वारे परतीच्या प्रवासाला लागले आहेत. बुधवारी  राजस्थान, कच्छ तसेच पंजाब व हरयाणाच्या काही भागांतून मोसमी वारे परतणार असल्याचा अंदाज केंद्रीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. देशाच्या वायव्य भागातून मोसमी वारे परतणार असले तरी राज्यातून मोसमी वारे परतण्यास वेळ आहे. दरम्यान, गुरुवारी व शुक्रवारी कोकण किनारपट्टीवरील काही ठिकाणी पावसाच्या मुसळधार सरी येण्याची शक्यता आहे.

गेल्या मंगळवारी मुंबईसह राज्यभरात अनेक ठिकाणी पाऊस पडला होता. त्यानंतर मध्य प्रदेश तसेच उत्तर भारतातही अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. मात्र आता राजस्थान, गुजरात, पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेश तसेच मध्य प्रदेशातील हवा कोरडी होण्यास सुरुवात झाली आहे. मोसमी वारे परतण्याचे निकष लक्षात घेता बुधवारी राजस्थानमधून मोसमी वारे परतल्याचे हवामानशास्त्र विभागाकडून जाहीर होण्याची शक्यता आहे. राजस्थानमधून सप्टेंबरमध्ये मोसमी वारे परतत असले तरी महाराष्ट्रात ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यंत पाऊस पडण्याचा अनुभव आहे.

सध्या दक्षिण भारतात केरळ व कर्नाटकमध्ये काही भागांत अतिवृष्टी होत असून हे वारे गुरुवारी कोकण किनारपट्टीवर पाऊस घेऊन येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे गुरुवारी कोकणात त्यातही विशेषत्वाने सिंधुदुर्ग व रत्नागिरीमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातही या काळात काही ठिकाणी पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे.

मोसमी वारे परतण्याचे निकष

१ सप्टेंबरनंतर देशाच्या वायव्य भागात सलग पाच दिवस कोरडे गेले, वातावरणाच्या खालच्या थरात प्रतिचक्रीवातस्थिती निर्माण झाल्यास आणि उपग्रहाच्या छायाचित्रांमधून तसेच टेफिग्राममधून हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी होत असल्याचे निदर्शनास आल्यास मोसमी वारे परतल्याचे जाहीर केले जाते.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-09-2017 at 04:52 IST