मुंबई : प्रक्षोभक वक्तव्य आणि सरकारी कामात अडथळे आणल्याच्या आरोपाप्रकरणी अटकेत असलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना २९ एप्रिलपर्यंत कारागृहातच राहावे लागणार आहे. वेळ नसल्याने राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यास सत्र न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. दोघांच्या अर्जावर न्यायालयाने २९ एप्रिलला सुनावणी ठेवली असली तरी वेळ उपलब्ध असेल तरच सुनावणी घेतली जाईल, असेही स्पष्ट केले.

वांद्रे न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर राणा दाम्पत्याने जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र वांद्रे न्यायालयाने पोलिसांना त्यावर उत्तर दाखल करण्याचे आदेश देऊन जामीन अर्जावरील सुनावणी २६ एप्रिलला ठेवली होती. परंतु राजद्रोहासारखा गंभीर गुन्हा दाखल केल्याने राणा दाम्पत्याने वांद्रे न्यायालयात जामिनासाठी केलेला अर्ज सोमवारी मागे घेतला. तसेच सत्र न्यायालयात धाव घेऊन जामिनाची मागणी केली होती. गंभीर आरोप असलेली प्रकरणे सत्र न्यायालयासमोरच सुनावणीसाठी येतात. 

अतिरिक्त सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर राणा दाम्पत्याचा जामीन अर्ज मंगळवारी सुनावणीसाठी आला. त्यावर दोन्ही पक्षांतर्फे थोडक्यात युक्तिवादही करण्यात आला. मात्र अन्य प्रकरणांवर सुनावणी घ्यायची असल्याने राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेऊ शकत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच अर्जावरील सुनावणी २९ एप्रिलला ठेवली व पोलिसांनी राणा दाम्पत्याच्या अर्जावर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. त्याच वेळी २९ एप्रिलला वेळ उपलब्ध असेल तरच राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर सुनावणी घेतली जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. कित्येक महिन्यांपासून कारागृहात असलेल्या अनेक कैद्यांचे जामीन अर्ज आपल्यासमोर प्रलंबित आहेत. त्यातील दोन अर्ज तर कर्करोग झालेल्या कैद्यांचे असल्याकडेही न्यायालयाने लक्ष वेधले. त्यावर राणा यांच्या वकिलांनी अशा कैद्यांचे जामीन अर्ज प्राधान्याने ऐकले जाण्याची गरज असल्याचे न्यायालयाला सांगितले.