मुंबई : देशाच्या आर्थिक राजधानीत परवडणारे घर खरेदी करण्याचे सर्वसामान्यांचे स्वप्न येत्या पाच वर्षांत पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. म्हाडाच्या मुंबई मंडळाने पुढील पाच वर्षांत सात हजार १९९ घरे बांधून पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून यातील ३२०० घरे येत्या दोन वर्षांत बांधून पूर्ण होणार आहेत. ही घरे सोडतीद्वारे सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न मंडळाचा आहे. यापैकी साधारण तीन हजार घरे ही गोरेगाव, पहाडी येथील आहेत.

मुंबईसारख्या महागडय़ा शहरात सर्वसामान्यांना म्हाडाच्या माध्यमातून घरांचे स्वप्न पूर्ण करणे शक्य होते. मात्र मागील दोन वर्षांपासून मुंबईतील घरांची सोडत निघालेली नाही. मंडळाकडे आता गृहनिर्मितीसाठी मोकळ्या जागा नसल्याने आता पुनर्विकासावर मंडळाला भर द्यावा लागत असून गृहनिर्मितीसाठी हाच एकमेव पर्याय सध्या उपलब्ध आहे. पण पुनर्विकास संथगतीने सुरू आहे. अनेक प्रकल्प रखडले असून पुनर्विकासाद्वारे घरे उपलब्ध होण्यास आणखी काही काळ लागणार आहे. त्यामुळे मंडळाने सध्या सुरू असलेले प्रकल्प पूर्ण करून पुढील पाच वर्षांत शक्य तितकी घरे सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

घरे कुठे?

* गोरेगाव पहाडी – ३०००

* कन्नमवारनगर – २४५०

* पवई – ५८८

* अँटॉप हिल, वडाळा – ४१७

* कांदिवली – ३५३

* मागाठाणे – ३०२

* याखेरीज  गोरेगाव, सिद्धार्थनगर, उन्नतनगर येथील ३५, जेव्हीपीडी, अंधेरी, खेरनगर आणि जोगेश्वरी येथील मिळून २३, चारकोप-कांदिवली येथील ३, कन्नमवारनगर संक्रमण शिबीर येथे २८ घरे उपलब्ध होणार आहेत.