रेल्वे मार्गावर चिखल झाल्याने रुळांचे नुकसान; सीएसटी-मुलुंडदरम्यान ४० ठिकाणे धोकादायक

गेल्या काही दिवसांमध्ये मध्य रेल्वेवर रेल्वे रुळांना तडा जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून त्यासाठी केवळ तापमानातील तफावत हे एकमेव कारण नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामागे शहरातील वस्त्यांमधून रेल्वे रुळांवर येणाऱ्या सांडपाण्याचाही हात असल्याचे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले. हे सांडपाणी रुळांखालील खडीमध्ये झिरपल्याने खडीमध्ये जमलेल्या मातीचा चिखल होऊन त्याचा घट्ट गोळा होतो. त्यामुळे गाडी चालताना रुळांना बसणारे हादरे कमी होण्याऐवजी वाढतात. परिणामी रुळांना तडा जाण्याच्या घटना घडतात.

[jwplayer PuSvtqP8]

मुंबई महापालिकेच्या हद्दीत ही ठिकाणे मुख्य मार्गावर सीएसटी ते मुलुंड यांदरम्यान पसरली आहेत. सीएसटी ते भायखळा या टप्प्यात दर १० ते १५ मीटरवर सांडपाणी रेल्वे हद्दीत येऊन पडते. त्यातही मशीद-सँडहर्स्ट रोड या टप्प्यात हे प्रमाण जास्त आहे. त्यानंतर करी रोड स्थानकाच्या उत्तरेकडे, भायखळा-चिंचपोकळीदरम्यान, माटुंगा-शीव स्थानकांदरम्यान तीन ते चार ठिकाणी, धारावी येथील धोबीघाट, कसाईवाडा पुलाजवळ, कुर्ला स्थानकाजवळ, विद्याविहार-घाटकोपर यांदरम्यान पश्चिमेकडे, घाटकोपर-विक्रोळी यांदरम्यान हरियाली नाला, विक्रोळी कांजूरमार्गदरम्यान पूर्वेकडे, कांजूर-भांडुप येथे दोन्ही बाजूंनी, भांडुप-मुलुंडदरम्यान पश्चिमेकडे या ठिकाणी सांडपाणी रुळांवर पडते.

रेल्वेने काही वर्षांपासूनच पालिकेकडे याबाबत पत्रव्यवहार केला आहे. पालिकेचे ३० ते ३५ नाले रेल्वे मार्गाखालून जातात. या नाल्यांसाठीचे नियोजन झाले आहे, पण कोणतेही नियोजन नसताना ४० ठिकाणांहून येणारे पाणी रेल्वे रुळांवर पडत आहे. या ४० ठिकाणांची यादीही रेल्वेने पालिकेला देऊन या सांडपाण्याची परस्पर व्यवस्था करण्याचे सुचवले होते. त्याबाबत अद्याप काहीच कार्यवाही झालेली नाही, असे मुंबई विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर सांगितले.

खडीचे काम काय?

रेल्वे रूळ टाकताना सर्वप्रथम जमीन सपाट केली जाते. त्यावर रुळांसाठी भक्कम पायाभरणी केली जाते. त्यावर तब्बल ३०० मिमीचा खडीचा थर टाकला जातो. त्यावर सिमेंटकाँक्रीटचे स्लिपर टाकून या स्लिपरवर रूळ टाकतात. भरभक्कम वजनाची गाडी वेगाने जाताना स्लिपर या खडीमुळे वर-खाली होतात. खडीच्या मधे मधे जागा असल्याने हवाही खेळती राहते आणि त्यामुळे गाडी जाण्यासाठी दबाव सहन करण्याची क्षमता राहते. या खडीची मात्रा योग्य नसेल तर रेल्वे वाहतुकीला धोका पोहोचू शकतो, असेही रेल्वे अधिकारी सांगतात.

सांडपाण्याचे मार्ग बंद?

रेल्वेच्या हद्दीत येणारे हे सांडपाणी थांबवण्यासाठी यंदाच्या पावसाळ्यानंतर रेल्वेने सांडपाणी येण्याचे मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यामुळे रेल्वेपुढील समस्येचा निकाल लागला तरी रहिवाशांचे प्रचंड हाल होतील, हे लक्षात घेऊन ही कारवाई टाळण्यात आली. त्यातच आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर अशी कारवाई झाली, तर सर्वच राजकीय पक्ष त्याचा वापर करतील, हेदेखील रेल्वे अधिकाऱ्यांनी ताडल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

सांडपाण्यामुळे काय धोका?

शहरातील रेल्वे मार्गाबाजूच्या लोकवस्त्यांमधील सांडपाणी रेल्वेच्या हद्दीत सोडले जाते. अनेक ठिकाणी हे सांडपाणी थेट रुळांवर पडते. हे पाणी रुळांखालील खडीमधून खाली झिरपते. या खडीचे घर्षण होऊन होणारी माती, रेल्वे मार्गाखाली जमणारी माती आणि खडी आदी या पाण्याबरोबर एकत्र होऊन त्याचा चिखल बनतो. हा चिखल खूपच कडक असून तो सुकल्यावर गाडीचा दबाव झेलण्यासाठी आवश्यक असलेली क्षमता कमी होते. त्यामुळे गाडी धावताना रुळाला बसणारे हादरे वाढतात आणि त्यामुळे स्लिपरचा काही भाग तुटणे किंवा थेट रुळाला तडा जाणे, या गोष्टी घडतात.

[jwplayer 9AX3hgPE]