पोलिसांनी छापा मारल्यानंतर अटक टाळण्यासाठी पळत असताना दोन महिलांचा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला. दक्षिण मुंबईतील ग्रँट रोड भागात बुधवारी रात्री १०.३० च्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. या दोन्ही महिला सेक्स वर्कर्स  होत्या. पोलिसांनी काल रात्री डी.बी.मार्ग परिसरातील ओम इमारतीवर छापा मारला. हा भाग सेक्स वर्कर्ससाठी ओळखला जातो.

पोलिसांचे पथक रात्री १०.३० च्या सुमारास ओम इमारतीमध्ये धडकल्यानंतर एकच गोंधळ उडाला. जे तळ मजल्यावर होते त्यांनी इतरांना सर्तक केले. त्यामुळे वरच्या मजल्यावरील सेक्स वर्कर्सची एकच पळापळ सुरु झाली असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांच्या जाळयात आपण सापडू नये यासाठी तिसऱ्या मजल्यावरील दोन महिला खिडकीला लागून असणाऱ्या दोरीला पकडून खाली उतरत असताना त्यांचा तोल सुटला व त्या खाली पडल्या.

पोलीस लगेच त्यांना भायखळयाच्या जे.जे.रुग्णालयात घेऊन गेले. तिथे उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. एक महिला ५० आणि दुसरी ३० वर्षांची होती. दोन्ही मूळच्या पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या होत्या असे पोलिसांनी सांगितले. डी.बी.मार्ग पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.