‘याद राखा, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना हात जरी लागला तरी महाराष्ट्रात तांडव करेन’, असा खणखणीत इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी दिला. बाबासाहेबांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यास विरोध करण्यामागे शरद पवार आणि भाजपमधील काही मंत्र्यांचे गलिच्छ राजकारण कारणीभूत असल्याचा आरोपही राज यांनी केला.
पुरंदरे यांना बुधवारी राजभवनात  पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.  देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनल्यापासून पद्धतशीरपणे ते ब्राह्मण असल्यामुळे राजकारण सुरु असून बाबासाहेब पुरंदरे यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्याचा पद्धतशीरपणे शरद पवार यांनी त्याचा वापर केल्याचा आरोप राज यांनी केला. शरद पवार आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी जातीय राजकारणाचे विष कालविण्याचे काम चालविले असून बाबासाहेबांच्या शिवचरित्रात जिजाऊंचा अपमान झाल्याचा साक्षात्कार आता पन्नास वर्षांनंतर कसा झाला असा सवालही राज यांनी केला. महाराष्ट्र भूषण पुरस्कार बाबासाहेबांना जाहीर झाल्यानंतर शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांनी त्यांचे अभिनंदन केले. अजित पवार त्यांचा आदर व्यक्त करतात मग आताच अचानक घुमजाव कशासाठी असा प्रश्नही त्यांनी विचारला. शरद पवार यांची फूस असल्यामुळेच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बाबासाहेबांना विरोध करण्याची हिम्मत केली, असे ते म्हणाले.