मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी सकाळी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे शेतकऱयांना मदतीसाठी निवेदन दिले. यावेळी त्यांच्यासोबत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मराठवाड्यातील पक्षाचे नेते राजेश टोपे आणि इतर नेते उपस्थित होते.
मराठवाड्यासह राज्यातील दुष्काळग्रस्त आणि अवकाळी पाऊसग्रस्त शेतकऱयांना सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणी यावेळी फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. शरद पवार गेले तीन दिवस मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांचा दौऱयावर होते. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या गावातील शेतकऱयांची भेट घेऊन परिस्थितीची पाहणी केली. दौऱयामध्ये शेतकऱयांनी ज्या ज्या मागण्या आणि व्यथा मांडल्या, त्याच एकत्रित स्वरुपात फडणवीस यांच्यापुढे निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले. दुष्काळग्रस्त शेतकऱयांना पीक विम्याची रक्कम तातडीने मिळाली पाहिजे. त्यांना कर्जमाफी दिली गेली पाहिजे. या संदर्भात राज्य सरकारने पुढील आठ दिवसांत सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून सरकारविरोधात आंदोलन करेल, असेही मुंडे यांनी सांगितले.
शरद पवार यांनी केलेल्या सूचनांचा राज्य सरकार सकारात्मक विचार करेल, असे आश्वासन यावेळी फडणवीस यांनी दिल्याचे समजते.