या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समाज माध्यमांवरील सर्वाधिक वापरकर्ते भारतात असले तरी सर्व स्मार्टफोनधारक समाज माध्यमांचा वापर करतातच असे नाही. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या समाज माध्यमांमध्ये भारतीय भाषांचा वापर होत असला तरी त्याला अनेक मर्यादा आहेत. या सर्व मर्यादा लक्षात घेऊन भारतातील ग्रामीण भागात इंटरनेटधारकांना समाज माध्यमांचा वापर करता यावा यासाठी आयआयटी कानपूर येथील तीन विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ‘शेअरचॅट’ नावाचे अ‍ॅप सुरू केले. भारतीय समाज माध्यम म्हणून ओळखले जात असलेले या अ‍ॅपच्या वापरकर्त्यांची संख्या दहा लाखांवर पोहचली आहे. इंग्रजीशिवाय चालणारे हे अ‍ॅप पूर्णत: भारतीय भाषांत उपलब्ध आहे.

देशात फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप या समाज माध्यम आणि संदेशवहन अ‍ॅप्सचा वापर होऊ लागला. मात्र या कंपनी भारतीय नाहीत. तेथे उपलब्ध असलेल्या भारतीय भाषांमध्ये अनेक त्रुटी आहेत. यामुळे ज्यांना इंग्रजी समजत नाही अशी मंडळी यापासून लांब राहतात. त्या संकेतस्थळांवर भारतीयांसाठी असे स्वतंत्र काही उपलब्ध नाही. या सर्वाचा विचार करून भारतीयांसाठी भारतात एखादे अ‍ॅप विकसित करण्याचा विचार मनात आला आणि डिसेंबर, २०१४मध्ये अ‍ॅपच्या कामाला सुरुवात झाल्याचे कंपनीचा सहसंस्थापक फारिद एहसान सांगतो. फारिदसोबत भानू सिंग आणि अंकुश सचदेव यांनीही कंपनीत सहभाग घेत कामास सुरुवात केली. सर्व अभ्यास झाल्यानंतर हे अ‍ॅप बाजारात आणले आणि या अ‍ॅपचे सध्या दहा लाख वापरकर्ते आहेत.

या अ‍ॅपमध्ये भारतीयांचा विचार करून भारतीयांच्या सोयीनुसार रचना करून त्यांना त्यांच्या भाषेत त्यांच्या भावना व्यक्त करण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. सध्य हे अ‍ॅप मराठी, हिंदी, तेलुगु या तीन भाषांमध्ये उपलब्ध असून लवकरच ते कानडी आणि गुजराती या भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. देशातील सर्वाधिक मोबाइलधारक हे ग्रामीण भागांतील असून फेसबुक आणि ट्विटरसारखे अ‍ॅप न वापरणाऱ्यांची संख्या सुमारे वीस कोटी इतकी आहे. या वीस कोटी मोबाइल वापरकर्त्यांना समाज माध्यमाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुरू करण्यात आलेले हे अ‍ॅप वापरकर्त्यांना सोपे व्हावे या उद्देशाने त्यात अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. या अ‍ॅपच्या माध्यमातून लोक त्यांच्या भाषेत त्यांना पाहिजे ते व्यक्त होऊ शकतात. यामध्ये त्या-त्या भाषेतील विविध विषयांची माहिती आणि बातम्याही प्रसिद्ध केल्या जातात. जेणेकरून हे सर्व लोकही इतर समाज माध्यमांप्रमाणेच माहितीच्या बाबतीत अद्ययावत राहतील. प्रत्येक भाषक लोकांची गरज ओळखून त्या-त्या अ‍ॅपवर माहिती पुरविली जात असल्यामुळे लोक अधिक व्यक्त होतात आणि अ‍ॅपशी जोडलेले राहतीत असेही फारिद सांगतो. देशात विविध भाषा असून प्रथम मराठी, तेलुगु आणि हिंदी या भाषा निवडण्यामागचे कारण काय यावर उत्तर देताना फारिद म्हणाला की, या भाषा सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या आहेत. या भाषांमध्ये आमच्या अ‍ॅपला यश मिळाले तर इतर भाषांमध्येही हे अ‍ॅप यशस्वी होऊ शकेल असा कयास आम्ही बांधला आणि या भाषांची निवड केली. या भाषांच्या यशानंतर इतर भाषांमध्ये हे अ‍ॅप यशस्वी होऊ शकेल असा आम्हाला विश्वास आहे.

निधी आणि उत्पन्नस्रोत

कंपनी स्थापन करण्यासाठी २०१४मध्ये मुंबईत एका वेंचर कॅपिटल कंपनीतून निधी उभारण्यात आल. यानंतर पुन्हा ऑक्टोबर, २०१५मध्ये निधीसंकलनासाठी विविध कंपन्यांशी संपर्क साधल्यानंतर निधी उभा राहिला. आता लवकरच परदेशातूनही निधी उभारण्याचा आमचा मानस आहे. सध्या आम्ही उत्पन्नाकडे फार लक्ष देत नाही आहोत. इतर कंपन्यांप्रमाणेच उत्पन्न कमविणे हा आमचाही उद्देश असून यासाठी अनेक योजना आहेत. मात्र अ‍ॅपवर जाहिराती देणार नसून प्रमोटेड पोस्ट आदीच्या माध्यमांतून उत्पन्न उभे करण्याचा आमचा मानस आहे. यासाठी भविष्यात अधिकाधिक लोकांपर्यंत त्यांच्या मातृभाषेत पोहोचण्याचा आमचा मानस आहे.

नवउद्यमींना सल्ला

सध्या देशात नवउद्योगांना चांगली संधी असून लोकांना नेमके काय पाहिजे आहे हे ओळखून व्यवसायाची रचना केली की तुम्हाला यश मिळतेच. याचबरोबर या सर्व बाजारात ग्राहक हा राजा आहे. यामुळे ग्राहकाला कधी नाराज करू नये असा सल्ला फारिदने नवउद्यमींना दिला आहे.

niraj.pandit@expressindia.com

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Share chat app made by three student
First published on: 16-06-2016 at 02:48 IST