मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने उत्साहाचे वातावरण पसरलेल्या राज्यातील शिंदे गटाने पुढील आठवडय़ात वांद्रे-कुर्ला संकुलात होणारा दसरा मेळावा अधिक भव्य करण्याचा निर्धार केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

खरी शिवसेना कोणाची, या संदर्भातील केंद्रीय निवडणूक आयोगासमोर होत असलेल्या सुनावणीला स्थगिती देण्यास मंगळवारी न्यायालयाने नकार दिला होता. या निकालाने शिंदे गटाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या आठवडय़ात दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये आयोजित करण्यास शिवसेनेस परवानगी मिळाल्याने शिंदे गट काहीसा अस्वस्थ झाला होता.

वांद्रे-कुर्ला संकुलात होणारा दसरा मेळावा यशस्वी करण्याचा आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी समर्थक आमदारांना दिला. हा मेळावा भव्यदिव्य झाला पाहिजे, या दृष्टीने नियोजन करण्यात येणार आहे.  आमदारांनी आपापल्या मतदारसंघांतून जास्तीत जास्त कार्यकर्ते जमा करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.  सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अर्थ आणि पुढील घडामोडी याबद्दल आमदारांना मार्गदर्शन करण्यात आले.