‘भगवती’च्या लोकार्पणावेळी शिवसेना-भाजप हातघाईवर

श्रेय लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने लाटण्याची पर्वणी नेत्यांनी साधून घेतली.

भगवती रुग्णालयाचे लोकार्पण सोमवारी करण्यात आले. 

श्रेयासाठी जोरदार घोषणायुध्द; पोलिसांच्या हस्तक्षेपानंतरही कार्यक्रम तणावातच

सेना-भाजपत सुरू असलेल्या उच्चस्तरीय भांडणाचे प्रतिसाद स्थानिक कार्यकर्त्यांमध्येही जोरदार उमटले असून बोरिवलीतील भगवती रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्यात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते हातघाईवर आले. घोषणाबाजीचा तणाव निवळण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. सुपरस्पेशालिटी करण्याच्या नावाखाली गेली तीन वर्षे बंद केलेल्या भगवती रुग्णालयाचा ११० खाटांचा ‘दवाखाना’ सुरू करण्याचे श्रेय घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांमध्ये अहमहमिका लागल्याचे दृश्य सोमवारी बोरिवलीत दिसले.

शिवसैनिकांच्या बाळासाहेबांचा विजय असो, शिवसेना झिंदाबाद आणि भाजपच्या भारतामाता की जय या घोषणायुद्धामुळे भगवती रुग्णालयाचा परिसर दणाणला. सोहळ्यासाठी आलेल्या महापौर स्नेहल आंबेकर, उपमहापौर अलका केरकर, स्थानिक खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासमोर हे नाटय़ घडले. सत्ताधारी आरोप-प्रत्यारोप करीत एकमेकांवर धावून गेले. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेत पोलिसांनी हस्तक्षेप केला. कार्यक्रमापूर्वी भाजपच्या घोषणा आणि त्यानंतर सेनेचे स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांनी उद्घाटन समारंभात दिलेले प्रत्युत्तर यामुळे संपूर्ण कार्यक्रम तणावातच पार पडला.

अवघ्या वर्षभरावर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर विकासकामांचे श्रेय लुटण्याची अहमहमिका सध्या शिवसेना-भाजपमध्ये सुरू आहे. त्याचा अतिशय केविलवाणा प्रयोग सोमवारी भगवती रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने मुंबईकरांना पाहायला मिळाला. मुळात डहाणूपासून ते गोरेगावपर्यंतच्या रुग्णांना माफक दरात वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या भगवतीने आतापर्यंत एक हजार खाटांपैकी अवघ्या ११० खाटांची क्षमता प्राप्त केली आहे; परंतु त्याचेही श्रेय लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने लाटण्याची पर्वणी नेत्यांनी साधून घेतली.

रेल्वे आणि रस्ते अपघातात जखमी झालेल्यांसाठी आधार केंद्र असलेल्या भगवतीमध्ये शस्त्रक्रिया सुरू होण्यासाठी आणखी पाच वर्षे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्यामुळे उपनगरवासीयांना दक्षिण मुंबईतच धाव घ्यावी लागणार आहे.

नांदेडमध्ये पुतळ्यांचे दहन; दगडफेक

राज्यातील सत्ताधारी भाजप व शिवसेनेत राज्यस्तरावर टोकदार झालेले शब्दप्रहार आता रस्त्यावरील राडय़ात रुपांतरित होत आहेत. शिवसेना नेत्यांवर केलेल्या टीकेमुळे भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांच्या पुतळ्याचे दहन झाल्यानंतर सोमवारी नांदेडमध्ये शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. या वेळी दगडफेक झाल्याने तणाव निर्माण झाला.

भाजप व शिवसेना या सत्तेतील भागीदारांत सुरुवातीपासूनच धुसफूस सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी माधव भंडारी यांच्या पुतळ्याचे जिल्ह्यत विविध ठिकाणी दहन करण्यात आले. त्यानंतर सोमवारी भाजयुमो पदाधिकाऱ्यांनी खासदार राऊत यांच्या पुतळ्याचे दहन केले.

या वेळी महानगराध्यक्ष संतुक हंबर्डे व दिलीपसिंघ सोढी यांच्यासह इतर कार्यकत्रे उपस्थित होते. आंदोलनाची माहिती असल्याने भाजप कार्यकर्त्यांना विरोध करण्यासाठी शिवसनिकही जमले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shiv sena and bjp supporters clashing in mumbai