विधानसभेसाठी जागा वाटपाचा कुठलाही फॉर्म्युला समोर आलेला नव्हता. त्यामुळे शिवसेनेने भाजपावर केलेल्या खोटारडेपणाच्या आरोपांचे आपण खंडन करतो असे भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. तसेच जनतेला वेठीला धरण्याचे काम शिवसेनेने केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. शिवसेनेच्या पत्रकार परिषदेनंतर ते माध्यमांशी बोलत होते.

मुनगंटीवार म्हणाले, निकालानंतर अचानक पत्रकार परिषद घेऊन आमच्यासमोर पर्याय खुले आहेत अशी जनतेला वेठीला धरण्याची घोषणा शिवसेनेने केल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहे. महायुतीच्या जनादेशाचा अनादर करुन भाजपाला खोटं ठरवण्याचं काम कोणी करु नये. भाजपाला खोटं ठरवण्याआगोदर त्यांनी विचार केला पाहिजे. अमित शाह आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांचा खोट बोलण्याचा प्रश्नच येत नाही. भाजपाचं सत्तेवर नव्हे तर जनतेवर प्रेम आहे. आम्हाला कोणताही खोटारडेपणा करायचा नाही, आम्हाला जनतेचे स्वप्न पूर्ण करायचंय.

मोदी हे माझे मोठे भाऊ आहेत असे जरी त्यांनी म्हटले असले तरी आपल्या या मोठ्या भावाबद्दल त्यांचे मन कलुषीत करण्याचा काम कोण करतंय याचा शोध उद्धव ठाकरेंनी घ्यावा, असा सल्ला मुनगंटीवार यांनी दिला. तसेच सत्तेत राहून मोदी आणि शाह यांच्यावर आजपर्यंत कोणत्याही मित्र पक्षातील लोकांनी टीका केलेली नाही. मात्र, शिवसेनेने सातत्याने सत्तेत राहून त्यांच्यावर टीका केली. त्यासाठी त्यांनी दुष्यंत चौटाला आणि उदयनराजे भोसले काय म्हणाले होते याचे उदाहरण दिले. मात्र, ही उदाहरण देऊन त्यांनी पाच वर्षे केलेल्या टीकेचे समर्थन कळलं नाही, असा टोलाही मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

‘प्राण जाये पर वचन न जाये’ या वचनाप्रमाणे भाजपाने काम केलं आहे. आम्ही मुंबई मनपातही कुठलंही पद घेतलं नाही. राम मंदिराच्या प्रश्नासाठी आम्ही उत्तर प्रदेशातील सरकारही कुर्बान केलं होतं, असेही उद्धव ठाकरेंच्या खोटेपणाच्या आरोपाला उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले.